*मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांडवी प्रोमेनेड येथे केले ‘गोमंतक जनक भगवान परशुराम अवतरण महोत्सव २०२६’चे उद्घाटन*
*पणजी, १९ एप्रिल २०२६*: सात दिवस चालणाऱ्या ‘गोमंतक जनक भगवान परशुराम अवतरण महोत्सव २०२६’चा आज सायंकाळी पणजीतील मांडवी प्रोमेनेड येथे भगवान परशुरामांच्या पुतळ्याजवळ गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ झाला. हा महोत्सव १९ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान होणार असून गोमंतक जनक भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला आहे. यामागचा उद्देश गोव्याला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाचे केंद्र म्हणून विकसित करणे हा आहे.
हा महोत्सव राष्ट्रीय परशुराम परिषद (गोवा प्रदेश) आणि पणजी नववर्ष स्वागत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून, माहिती आणि प्रसिद्धी विभाग, गोवा सरकार यांच्या सहकार्याने आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) यांच्या व्यवस्थापनाखाली पार पडत आहे.
उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक कलश यात्रा आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर काशीहून आलेल्या पुजार्यांनी भगवान परशुरामांची महाआरती केली. तसेच भगवान परशुराम यांच्या जीवन आणि शिकवणीवर आधारित लाईट अँड साऊंड शोही पुतळ्यावर सादर करण्यात आला.
महोत्सवाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “गोमंतक जनक भगवान परशुराम अवतरण महोत्सव हा एक उत्तम उपक्रम आहे, जो आपल्या आध्यात्मिक वारशाला आणि सांस्कृतिक मूल्यांना पुढे आणतो. भगवान परशुराम हे धर्म, धैर्य आणि सेवाभाव यांचे प्रतीक आहेत आणि ही मूल्ये आपल्या तरुणांना प्रेरणा देणारी आहेत. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी सर्व आयोजकांचे अभिनंदन करतो. पुढील सात दिवसांत सर्व गोमंतकवासीय आणि देशभरातील भक्तांनी मांडवी प्रोमेनेड येथे येऊन कथा वाचन, महाआरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे आणि आपल्या समृद्ध परंपरांचा अनुभव घ्यावा. हा महोत्सव श्रद्धा, एकता आणि गोव्याची आध्यात्मिक ओळख अधिक मजबूत करेल.”
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डिलायला लोबो (आमदार, शिवोली व ईएसजी उपाध्यक्ष) आणि जित आरोलकर (आमदार, मांद्रे) उपस्थित होते. तसेच दामू नाईक (भाजप प्रदेशाध्यक्ष) उपस्थित होते. विशेष पाहुणे म्हणून सुनील भराला (राष्ट्रीय परशुराम परिषदेचे संस्थापक व माजी मंत्री, उत्तर प्रदेश) आणि श्रीहरी आठले (शिक्षणतज्ज्ञ, जन शिक्षण संस्थान, गोवा) यांनीही उपस्थिती दर्शवली.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गणेश वंदना (भरतनाट्यम), भगवान परशुराम गाथा (नाट्य), भार्गवराम चरितम (भरतनाट्यम) आणि परशुराम आनंद उत्सव (कथक) यांचा समावेश होता. याशिवाय ‘ॐ परशुरामाय नमः’ या भक्तिगीताच्या म्युझिक सीडीचे लोकार्पण करण्यात आले. हे गीत रंजीता रायकर नागवेकर यांनी लिहिले असून अक्षय प्रकाश नाईक यांनी गायले आहे. हे गाणे डाउनलोड करण्यासाठी QR कोड असलेली पत्रकेही वाटप करण्यात आली. गीतकाराचा दामोदर (दामू) जी. नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सायंकाळचा कार्यक्रम २५ मिनिटांच्या महाआरती आणि लाईट अँड साऊंड शोने समाप्त झाला. हा महोत्सव २६ एप्रिल २०२६ पर्यंत सुरू राहणार असून दररोज महाआरती, लाईट अँड साऊंड शो, पूजा विधी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भक्तीमय उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच २० ते २४ एप्रिल दरम्यान परम पूज्य दिलीप कृष्ण भारद्वाज जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान परशुराम कथा वाचन आयोजित केले जाणार आहे.






