‘जेन झी’ने भाऊसाहेब बांदोडकरांकडून प्रेरणा घ्यावी : पांडुरंग गावकर
खांडोळा सरकारी महाविद्यालयात चतुर्थ भाऊसाहेब बांदोडकर स्मृती व्याख्यान संपन्न
हळदोणा वाताहार
गोव्याच्या राजकारणाला नवी दिशा नवी दिशा द्यायची असेल तर, तर आजच्या तरुण पिढीने म्हणजेच ‘जेन झी ‘ने प्रथम गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे राजकारण आणि त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत. आगामी निवडणुकांमध्ये ही तरुण पिढी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे प्रतिपादन ‘गोवन वार्ता’चे संपादक पांडुरंग गावकर यांनी केले. खांडोळा येथील सरकारी महाविद्यालयात आयोजित चौथ्या ‘भाऊसाहेब बांदोडकर स्मृती व्याख्याना’त ते बोलत होते.
यावेळी बोलताना गावकर म्हणाले की, गोव्यातील शैक्षणिक प्रगती, सामाजिक न्याय आणि आर्थिक विकासाचा पाया खऱ्या अर्थाने भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कार्यकाळात रचला गेला. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य नागरिकांनाही आमदार होण्याची सुवर्णसंधी मिळाली. मात्र, आज परिस्थिती बदलली असून सर्वसामान्य माणूस राजकारणात येण्यास कचरत आहे.
अशावेळी सर्वसामान्य जनतेचा कैवारी बनून तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविणारे भाऊसाहेबांसारखे अजातशत्रू व्यक्तिमत्व आजच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर वेगळेपणाने उठून दिसते
हे अधोरेखित करताना एकेकाळी प्रादेशिक पक्षांच्या बळावर चालणारे गोव्याचे राजकारण आता हळूहळू राष्ट्रीय पक्षांच्या वर्चस्वाखाली गेले असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. (डॉ.) पूर्णकला सामंत यांनी भाऊसाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भाऊसाहेबांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या शाळांमध्येच आपण शिक्षण घेतल्याचे सांगत, त्यांच्या या शैक्षणिक दूरदृष्टीचे आपण कायम ऋणी राहू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. उपप्राचार्य डॉ. डीलिक्टा डिकॉस्ता यांनीही यावेळी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. भाऊसाहेब बांदोडकर त्यांच्या शाळेतील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांना भेटण्याची संधी हुकली. आपण जेव्हा मिरामार येथील त्यांच्या समाधीला भेट देते, तेव्हा या महान नेत्याला कधीही भेटता न आल्याची मोठी खंत मनात दाटून येते, असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाला राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि उपप्राचार्य डॉ. सीमा साळगावकर, कार्यक्रम समन्वयक डॉ. लवू वरक, डॉ. प्रकाश वझरीकर, डॉ. आशा गेहलोत, ऑस्कर नोरोन्हा, निलेश नाईक, कौशिक मराठे, स्नेहा शेट, अकबर गडेड यांच्यासह राज्यशास्त्र व इतर विभागांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिज्ञा परब यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तनुजा गावडे यांनी मानले.
फोटो भारत बेतकेकर






