प्रेषक,
सौ. क्रांती राजेश कोरगावकर,
म्हापसा गोवा.
दिनांक: २१जून २०२६.
९०४९३४२३७३
प्रति,
संपादक,
दिनांक: २२/०६/२०२६
विषय : वटपौर्णिमा
महोदय,
ये्
. ले््््.
*वटपौर्णिमा वटसावित्रीचे व्रत* :
मृगाचा पाऊस सुरू झाला जून महिना सुरू झाला की विवाहित सौभाग्यवती स्त्रिया वाट पाहतात ती वटसावित्री व्रताची. विवाहित स्त्रियांसाठी असणारे हे वटसावित्रीचे व्रत अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. येत्या २९ जून २०२६ रोजी वटपौर्णिमा आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदू स्त्रिया हे व्रत करतात. वटसावित्रीची कथा आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे. तरी ही कथा थोडक्यात पाहूया.
*वटसावित्रीची (सत्यवान–सावित्रीची) कथा* :
राजा अश्वपति नावाचा एक राजा होता. त्याला अपत्य नव्हते. त्याने देवी सावित्रीची कठोर उपासना केली. देवीच्या कृपेने त्याला एक सुंदर, बुद्धिमान आणि सद्गुणी कन्या झाली. तिचे नाव सावित्री ठेवले. सावित्री विवाहयोग्य झाल्यावर तिने स्वतःसाठी वर निवडण्याचे ठरवले. तिने वनात राहणाऱ्या, सत्यप्रिय व गुणवान सत्यवान याला पती म्हणून निवडले. परंतु ऋषींनी सांगितले की सत्यवानाचे आयुष्य फक्त एक वर्ष उरले आहे. तरीही सावित्रीने दृढनिश्चयाने सत्यवानाशी विवाह केला. विवाहानंतर सावित्री आपल्या पतीसोबत वनात राहू लागली. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ येताच तिने उपवास व व्रत केले. ठरलेल्या दिवशी सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला. सावित्रीही त्याच्यासोबत गेली. जंगलात सत्यवानाला अचानक चक्कर आली आणि तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून पडला. त्याच वेळी यमराज त्याचा प्राण घेण्यासाठी आले. यमराज सत्यवानाचा प्राण घेऊन निघाले. सावित्री त्यांच्यामागे चालू लागली. तिच्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने, बुद्धिमत्तेने आणि नम्रतेने यमराज प्रसन्न झाले. त्यांनी तिला अनेक वर मागण्यास सांगितले. सावित्रीने प्रथम आपल्या सासऱ्यांचे राज्य व दृष्टी परत मिळावी असा वर मागितला. नंतर आपल्या वडिलांना पुत्रप्राप्तीचा वर मागितला. शेवटी तिने “मला सत्यवानापासून शंभर पुत्र होवोत” असा वर मागितला.
यमराजांनी तो वर दिला. पण त्यांना लगेच जाणवले की सत्यवान जिवंत नसल्यास हा वर पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे ते सावित्रीच्या बुद्धीवर व पतिव्रतेवर प्रसन्न झाले आणि त्यांनी सत्यवानाला पुन्हा जीवनदान दिले. अशा प्रकारे सावित्रीने आपल्या दृढनिश्चय, प्रेम आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याने यमदेवाशी शास्त्रचर्चा करून त्याला त्यामध्ये हरवते आणि पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत मिळवते. पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते. सावित्री आणि यमाचे वटवृक्षाखाली संभाषण झाल्यामुळे या दिवशी वटवृक्षाला महत्त्व प्राप्त झाले. आज आपण वटपौर्णिमेच्या व्रताविषयी जाणून घेऊया.
*वटपौर्णिमेचे महत्त्व* :
वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात. भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतीव्रतांपैकी सावित्री हीच आदर्श मानलेली आहे. तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रिया हे व्रत करतात. वटपौर्णिमा या व्रताची मुख्य देवता सावित्रीसह ब्रह्मदेव असून सत्यवान, नारद आणि यमधर्म या अन्य देवता आहेत.
*वटपौर्णिमेचे व्रत करण्याची पद्धत* :
वटपौर्णिमेचे व्रत करण्याची शास्त्रीय पद्धत काय आहे, हे आपण समजून घेऊया. प्रथम सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा. त्यानंतर वडाचे षोडशोपचारे पूजन करावे. पूजेत अभिषेक झाल्यानंतर वडाला सूत्रवेष्टन करावे, म्हणजे वडाच्या खोडाला सुती धाग्याने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीनदा गुंडाळावे. पूजेच्या शेवटी ‘अखंड सौभाग्य लाभू दे, जन्मोजन्मी हाच पती लाभू दे. तसेच धनधान्य आणि कुल यांची वृद्धी होऊ दे’, अशी सावित्रीसह ब्रह्मदेवाला प्रार्थना करावी. या दिवशी स्त्रियांनी संपूर्ण दिवस उपवास करावा. या दिवशी ब्रह्मांडात शिवतत्त्वाच्या लहरी अधिक प्रमाणात कार्यरत असतात. सुती धाग्यामध्ये देवतेच्या लहरी खेचल्या जाऊन त्या प्रक्षेपितही केल्या जातात. त्यामुळे संपूर्ण वातावरणच सात्त्विक बनते.
*पूजनामध्ये पाच फळे अर्पण करण्यामागील शास्त्र* :
कोणत्याही पूजाविधीत पाच फळे अर्पण करण्याला महत्त्व आहे. वडाच्या पूजेच्या वेळीही ५ फळे पूजनात अर्पण केली जाते. फळांमध्ये सहसा पाण्याचा अंश अधिक असतो. फळे ही मधुर रसाशी, म्हणजेच आपतत्त्वाशी निगडीत आहेत. व्यक्तीच्या शरिरातही पाण्याचा अंश अधिक असतो. म्हणजेच पूजकाचा देहही पृथ्वी आणि आप तत्त्वात्मक आहे. त्यामुळे फळांच्या माध्यमातून ग्रहण होणाऱ्या देवतांच्या लहरी कमी कालावधीत पूजन करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोचतात. त्यामुळे पूजकाला त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो; म्हणून पूजेमध्ये ५ फळे अर्पण केली जातात.
*वटवृक्षाचे महत्त्व* :
वटवृक्षाचे महत्त्वही पुष्कळ आहे. वड, पिंपळ, औदुंबर आणि शमी हे पवित्र अन् यज्ञवृक्ष म्हणून सांगितले आहेत. या वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य अधिक असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही पुष्कळ होतो. प्रयागच्या अक्षय्य वटाखाली राम, लक्ष्मण आणि सीता विसावले होते. प्रलय झाला तरी वटवृक्ष असतोच. तो युगान्ताचा साथीदार आहे.
*वटपौर्णिमेला झाडाऐवजी वडाच्या फांदीची पूजा करणे अयोग्य* :
हिंदु संस्कृती ही निसर्गाला देव मानून त्याची पूजा करण्याची शिकवण देणारी आहे; मात्र काही जणांकडून पर्यावरणाच्या नावाखाली आध्यात्मिक बाजू विचारात न घेता हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी अपप्रचार केला जातो. उदाहरणार्थ, वटपौर्णिमेला वडाची पूजा करण्यापेक्षा वडाची एक फांदी घरी आणून ती कुंडीत लावून त्याची पूजा करावी, असा प्रचार केला जातो; पण असे करणे आध्यात्मिकदृष्ट्या अयोग्य आहे. वडाच्या मूळ खोडामध्ये अधिक प्रमाणात शिवतत्त्व सामावलेले असल्याने प्रत्यक्ष झाडाची भावपूर्ण पूजा केली, तर ३० टक्के इतक्या प्रमाणात आध्यात्मिक लाभहोऊ शकतो; मात्र झाडाची फांदी कापून तिची पूजा केली, तर केवळ २-३ टक्के एवढ्या प्रमाणातच लाभ होऊ शकतो. झाडापासून त्याची एखादी फांदी वेगळी केली, तर तिच्यातील सजीव धारणा संपते. फांदी ही झाडाच्या मूळ चेतनेपासून वेगळी झाल्याने तिच्यामध्ये चैतन्य ग्रहण करण्याची, प्रक्षेपित करण्याची शक्ती नगण्य होते. त्यामुळे पूजेचा मूळ आध्यात्मिक उद्देश साध्य होत नाही. त्यामुळे वटपौर्णिमेला वडाची फांदी घरात आणून त्याची पूजा करण्यापेक्षा निसर्गातील वटवृक्षाची म्हणजे मूळ झाडाचीच पूजा करावी.
*आपत्काळामध्ये वटपौर्णिमेचे व्रत कसे करावे?* :
नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा वैयक्तिक कारणांमुळे बाहेर जाऊन पूजन करणे शक्य नसल्यास घरच्या घरीच हे व्रत करावे. घरीच पाट किंवा चौरंग यांना प्रदक्षिणा घालता येईल, अशा रितीने तो पूर्व-पश्चिम ठेवावा. पाट किंवा चौरंग यांवर गंधाने वटवृक्षाचे रेखाचित्र काढावे. आपण प्रत्यक्ष वटवृक्षाखाली बसलो आहोत, असा भाव ठेवून त्याचे विधिवत् पूजन करावे. आपण प्रत्यक्ष वटवृक्षालाच प्रदक्षिणा घालत आहोत, हा भाव ठेवून या पाटाला प्रदक्षिणा घालत सूताचे वेष्टन करावे म्हणजे दोरा गुंडाळावा आणि पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी प्रार्थना करावी. शहरात ‘फ्लॅट’ मध्ये रहाणाऱ्या व्यक्तींना घरात पुरेशी जागा उपलब्ध नसल्यास त्यांनी पूजनानंतर प्रार्थना करून पाट बाजूला ठेवला तरी चालेल. ‘भाव तेथे देव’ ही हिंदु धर्माची शिकवण आहे. त्यामुळे काही बंधनांमुळे आपल्याला नेहमीप्रमाणे व्रत करता आले नाही, तरी आपण भाव ठेवून अशा पद्धतीने कृती करू शकतो. हा आपद्धर्म आहे. आपद्धर्म म्हणजे आपत्तीत असतांना किंवा संकटकाळात हिंदु धर्माने सांगितलेला धर्माचरणाचा पर्याय हे लक्षात घेऊया, ज्या ठिकाणी खरेच बाहेर पडून वडाची पूजा करणे शक्य नाही, अशा ठिकाणी आपद्धर्मानुसार हे व्रत करावे. ज्या ठिकाणी नेहमीप्रमाणे पूजा करणे शक्य आहे, त्यांनी नेहमीप्रमाणेच पूजा करावी.
नमस्कार!






