पीपल्स विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
पणजी : पणजी पीपल्स विद्यालयात ८०वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ पीपल्सच्या माजी विद्यार्थीनी आणि एम. डी. कम्युनिकेशन्सच्या संचालिका डॉ. वीणा आंगले या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या.
डॉ. आंगले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.याप्रसंगी व्यवस्थापकीय विश्वस्त राहुल देशपांडे, विश्वस्त शिल्पा देशपांडे आणि विविध विभागांचे प्रमुख तसेच पालक -शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. आंगले
यांनी विद्यार्थ्यांना एकता, अखंडता, शिस्त आणि लोकशाही या मूल्यांचे जतन करण्याचे तसेच देशाचा गौरव वाढविण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले. आर्या कुलकर्णी हिने आपल्या भाषणातून स्वातंत्र्याचा खरा अर्थ अधोरेखित केला. माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर लघुनाटिका विशेष प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक ठरली.
धन्या हेगडे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रकृती शामेन हिने आभार मानले. या कार्यक्रमाला शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि पीटीए सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.






