🌺माझ्या गावच्या मातीत 🌺
जयसिंगपूर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात वसलेले एक छोटेसे गाव. छत्रपती शाहू महाराजांना आपल्या वडिलांच्या नावे एक शहर वसवायची इच्छा होती. कोल्हापूरच्या गादीवर असताना शाहू महाराज एकदा शिकारी साठी गेले असता एका जंगलातून जाताना त्यांनी ही जागा हेरून ठेवली होती. आजूबाजूला बरीच खेडी, तिथे पिकणारा मुबलक भाजी पाला, कडधान्य, गुळ या मालाला शेतकर्यांना बाजारपेठ मिळत नसल्याने तो सर्व सांगलीच्या बाजारपेठेत जात होता. आणि अस्सल कोल्हापुरी गूळ तिथे राजापूरचा गूळ म्हणून विकला जात होता. तिथल्या रयतेचा फायदा होण्यासाठी त्यांनी युरोपच्या स्थापत्य तज्ञांच्या मदतीने जयसिंगपूरचा आराखडा तयार केला. एक प्रमुख रस्ता काटकोनात आखून त्यामध्ये २१ गल्ल्या व मध्ये ऐसपैस जागा (बोळ) ठेवून आराखडा तयार करून हे गाव वसले.
सांगली कोल्हापूरला जोडणार्या मार्गावरील प्रमूख शहर म्हणून जयसिंगपूर उदयास आले. एक छोटेखानी शहर असले तरी आधी ते गावच होते. गावात रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यात आली आणि जयसिंगपूरच्या बाजारपेठेतील माल भारतभर पोहोचायला सुरू वात झाली. कालांतराने इथे उद्योग वाढले त्यामुळे अनेक लोक व्यापारासाठी जयसिंगपूरला स्थलांतरित झाले.
आजूबाजूला नांदणी ,उमळवाड, जैनापूर,निपाणी, उदगाव अशा अनेक खेड्यातून तंबाखू, गूळ, भुईमूगाच्या शेंगा, कडधान्य इथे येऊन बरीच आर्थिक उलाढाल होऊ लागली.
येथे व्यापाराच्या निमित्ताने स्थाईक झालेली मारवाडी व जैन समाजाची बरीच वस्ती आहे. आजच्या अद्ययावत घोडावत इंडस्ट्रीतील विद्यमान संजय घोडावतांचे याच गावात निवासस्थान आहे.
आमच्या बालपणी इथे मोजक्याच शाळा होत्या. एक इंग्रजी शाळा होती. गावच्या वेशीकडील भागात शिरोळ रस्त्याला वर चढाव काढून कॉलेज होते. ते एकूलते एक कॉलेज आमच्या साठी अप्रूप होते. आमच्या घरापासून कॉलेजचे अंतर ३-४ मैल असले तरी कॉलेजला पायीच जायचो. तेव्हा मजा यायची. मुख्य वस्ती कॉलेज पर्यंत विरळच होती. पण आता आसपासचा भाग चारी बाजूनी अगदी दाट वस्त्यांत वाढलेला दिसतो.
त्यावेळी सुट्टीच्या दिवसात किंवा कॉलेजच्या मधल्या वेळेत आम्ही कोल्हापूर रोडला जयसिंगपूरचा प्रसिद्ध भडंग खायला जायचो. त्यातील मजा अवर्णनीय होती. पण आता तिथवर अनेक दुकाने थाटून ती जागा गजबजून गेली आहे. जयसिंगपूरचा हा भडंग अमेरिकेपर्यंत प्रसिद्ध आहे हे आताशा मला कळाले.
गावात दत्ताचे टुमदार मंदिर आहे. गावचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वरदेव हे पूर्वी छोटेखानी देऊळ होते. पण आता बर्याच मोठ्या प्रमाणात प्रशस्त जागेत ती वास्तू उभी आहे. त्याकाळी गुढीपाडव्याला देवाचा जत्रोत्सव असायचा. अजूनही होतो. तो आमच्या साठी एक आनंदाचा उत्सव असायचा. जत्रेत येणार्या अनेक विविध वस्तू पहाण्यात, जत्रेत फिरण्यात एक औरच मजा असायची. दूसरे एक मंदिर म्हणजे श्रीरामाचे मंदीर. या मंदिरात पंचायतन मूर्ती आहेत. त्या मूर्ती एक उत्कृष्ट व सुबक मूर्ती कलेचा आविष्कार आहेत. या मंदिराला भेट देण्यासाठी दूरवरून लोक येतात.
नृसिंहवाडी मुळे जयसिंगपूरची ओळख फार जणांना व्हायची. पूर्वी महाराष्ट्रातून व इतर राज्यांतून नृसिंहवाडीला जाणारे लोक जयसिंगपूरहून जायचे पण नंतर मधून बायपास झाल्याने आता सरळ नृसिंहवाडीला जाता येते.
- प्रतिभा बेसरे






