मणिपाल हॉस्पिटल गोवा येथे फुफ्फुस व छातीच्या आजारांच्या प्रगत निदानासाठी प्रथमच ईबीयूएस सुविधा
कर्करोगाचे निदान, त्याची अवस्था निश्चित करणे आणि छातीच्या इतर आजारांची तपासणी आता गोव्यातच शक्य
पणजी, १० ऑक्टोबर २०२६ : मणिपाल हॉस्पिटल गोवा येथे फुफ्फुस आणि छातीच्या आजारांचे निदान करण्यासाठी प्रथमच एन्डोब्रॉन्कियल अल्ट्रासाऊंड (ईबीयूएस) सुविधा सुरू करण्यात आली आहे. या अत्याधुनिक आणि कमीत कमी शस्त्रक्रियात्मक हस्तक्षेपाची आवश्यकता असलेल्या निदान तंत्रज्ञानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग तसेच छातीतील इतर गुंतागुंतीच्या आजारांचे निदान करणे अधिक सुलभ होणार आहे.
या सुविधेच्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक डॉ. स्टेसी फर्नांडिस यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुणे, सन्माननीय पाहुणे डॉ. जॉन मुचाहरी, डॉ. अश्विनी कुलासाे, डॉ. उदय काकोडकर, डॉ. दुर्गा लवंदे आणि डॉ. प्रवीण भट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सुविधेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी सांगितले की, संशयित फुफ्फुसाचा कर्करोग, क्षयरोग, सारकॉइडोसिस आणि लिम्फोमा यांसारख्या आजारांचे निश्चित निदान करण्यासाठी ईबीयूएस हे महत्त्वाचे आणि आधुनिक तंत्रज्ञान आहे. या आजारांच्या निदानासाठी अनेकदा ऊतींच्या नमुन्यांची तपासणी आवश्यक असते.
ते म्हणाले, “ईबीयूएस सुविधा गोव्यात उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना विशेष तपासण्यांसाठी राज्याबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांचा प्रवास, निवास, भोजन आणि इतर खर्च वाचेल. ईबीयूएससारख्या विशेष तपासण्यांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना या सुविधेचा मोठा फायदा होईल.”
ईबीयूएस तंत्रज्ञानामध्ये ब्रॉन्कोस्कोपी आणि अल्ट्रासाऊंड प्रतिमांचा एकत्रित वापर केला जातो. यामध्ये श्वसनमार्गातून एक पातळ आणि लवचिक नलिका शरीरात सोडून छातीतील लसिकाग्रंथींचे निरीक्षण केले जाते आणि आवश्यकतेनुसार ऊतींचे नमुने घेतले जातात. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान आणि त्याची अवस्था निश्चित करण्याबरोबरच क्षयरोग, सारकॉइडोसिस, लिम्फोमा तसेच छातीतील लसिकाग्रंथींशी संबंधित इतर आजारांचे निदान करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे. काही प्रकरणांमध्ये अधिक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांची गरजही यामुळे कमी होऊ शकते.
मणिपाल हॉस्पिटल गोव्यातील सल्लागार फुफ्फुसरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी कुलासाे म्हणाल्या, “एन्डोब्रॉन्कियल अल्ट्रासाऊंड हे आधुनिक श्वसनरोग उपचारशास्त्रातील महत्त्वाचे पाऊल आहे. या तंत्रज्ञानामुळे छातीतील लसिकाग्रंथींची तपासणी करून कमीत कमी हस्तक्षेपाने ऊतींचे नमुने घेणे शक्य होते. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान आणि त्याची अवस्था निश्चित करण्याबरोबरच संसर्गजन्य आणि दाहजन्य आजार ओळखण्यासाठीही ही सुविधा महत्त्वाची आहे. गोव्यात हे तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना राज्याबाहेर न जाता आपल्या जवळच प्रगत निदान सुविधा मिळू शकतील.”
मणिपाल हॉस्पिटल गोव्यातील इंटरव्हेन्शनल पल्मोनोलॉजी विभागाचे सल्लागार डॉ. जॉन मुचाहरी म्हणाले, “ईबीयूएस सुविधेमुळे गोव्यातील प्रगत वैद्यकीय निदान व्यवस्थेला बळ मिळणार आहे. विशेषतः कर्करोगाचा संशय असलेल्या रुग्णांमध्ये, छातीतील लसिकाग्रंथींची अनाकलनीय वाढ झालेल्या प्रकरणांमध्ये आणि गुंतागुंतीच्या छातीविकारांमध्ये निश्चित निदान करण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल. विविध वैद्यकीय विभागांच्या समन्वयातून रुग्णांना अधिक दर्जेदार आणि परिणामकारक उपचार देण्यास मदत होईल.”
मणिपाल हॉस्पिटल गोव्यातील सल्लागार पॅथॉलॉजिस्ट डॉ. ब्रिझेल्डा डिसोझा म्हणाल्या, “ईबीयूएस-टीबीएनए हे कमीत कमी हस्तक्षेपाचे तंत्र असून, संसर्ग, दाह किंवा कर्करोगाचे निदान करण्यासाठी पारंपरिक प्रतिमाधारित तपासण्यांच्या तुलनेत अधिक अचूक माहिती मिळवून देऊ शकते. रॅपिड ऑन-साइट इव्हॅल्युएशन (आरओएसई) या तंत्रामुळे तपासणीची निदानक्षमता वाढते. तसेच, गोळा केलेल्या ऊतींच्या नमुन्यांचा वापर जनुकीय तपासण्यांसारख्या विशेष चाचण्यांसाठी करता येतो. त्यामुळे रुग्णाच्या गरजेनुसार वैयक्तिक उपचारांचे नियोजन करणे शक्य होते.”
मणिपाल हॉस्पिटल गोव्याचे संचालक सुरेंद्र प्रसाद म्हणाले, “ईबीयूएस सुविधा सुरू करून आम्ही गोव्यात प्रगत आणि कमीत कमी हस्तक्षेपाच्या निदान सेवा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला आहे. यामुळे रुग्णांना अधिक जलद आणि अचूक निदानासह वेळेत उपचार मिळण्यास मदत होईल. विशेष तपासण्यांसाठी राज्याबाहेर जाण्याची गरजही कमी होईल.”
उद्घाटन सोहळ्याच्या समारोपप्रसंगी मणिपाल हॉस्पिटल गोव्याच्या कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी आभारप्रदर्शन केले. ही सुविधा सुरू करण्यासाठी योगदान देणारे रुग्णालयाचे व्यवस्थापन, वैद्यकीय पथके आणि विविध सहाय्यक विभागांचे त्यांनी आभार मानले. गोवा आणि आसपासच्या भागांतील रुग्णांना विशेष निदान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध वैद्यकीय विभागांमधील समन्वयाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
ईबीयूएस सुविधेमुळे फुफ्फुसरोग विभाग, वैद्यकीय आणि किरणोपचार कर्करोग विभाग, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी आणि छातीच्या शस्त्रक्रिया विभाग यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होणार आहे. परिणामी, फुफ्फुसाचा कर्करोग आणि छातीच्या इतर गुंतागुंतीच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांचे अचूक निदान आणि उपचारांचे नियोजन करणे अधिक प्रभावी होईल.
मणिपाल हॉस्पिटल गोवा येथे ही सुविधा सुरू झाल्यामुळे गोव्यासह कोकणातील कोल्हापूर ते मंगळुरू या विस्तृत परिसरातील रुग्णांना प्रगत निदान सेवा उपलब्ध होणार आहेत. विशेष तपासण्यांसाठी राज्याबाहेर जाण्याची गरज कमी होऊन रुग्णांचा वेळ, पैसा आणि प्रवासाचा त्रास वाचण्यास मदत होईल.






