*श्री गणेशचतुर्थी*

_

दिनांक : ०८.०९.२०२६

*श्री गणेशचतुर्थी*
श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटीने कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेश-तत्त्वाचा अधिक लाभ होतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. गणेशोत्सव आदर्शरित्या कसा साजरा करावा, गणेश मूर्तीचे विसर्जन कसे करावे, याविषयीची माहिती पुढील लेखांतून समजून घेऊया.

*श्री गणेश चतुर्थी या दिवशी करायचा पूजाविधि*
सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. गणेशभक्तांना ही पूजा भावपूर्ण करता यावी, या उद्देशाने गणेशमूर्तीची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी आणि त्यातून गणेश पूजनाचा लाभ करून घेण्यासाठी काही उपयुक्त माहिती पाहूया.

*श्री गणेश चतुर्थीला पुजावयाची मूर्ती कशी असावी ?*
चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी, तसेच पर्यावरणाला घातक आहे ! मूर्तीची उंची अधिकाधिक एक फूट ते दीड फूट असावी ! मूर्ती शास्त्रानुसार बनवलेली, पाटावर बसलेली, डाव्या सोंडेची अन् नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी ! बाजारातील आकर्षक मूर्तींच्या मोहात न अडकता अथर्वशीर्षात केलेल्या वर्णनानुसारच गणेशमूर्ती घ्या !

*श्री गणेशाला दूर्वा वहाव्यात !*
दूर्वांमध्ये गणेश तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अत्याधिक आहे. श्री गणेशाला कोवळ्या दूर्वा विषम संख्येने (न्यूनतम ३ किंवा ५,७, २१ इ.) वाहाव्यात. दूर्वांना विषम संख्येच्या पात्या असाव्यात. दूर्वा एकत्रित बांधून वाहिल्याने त्यांचा गंध बराच काळ टिकतो. या गंधामुळे गणेश तत्त्व मूर्तीकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होते आणि टिकूनही रहाते. दूर्वा अधिक वेळ टवटवीत रहाण्यासाठी त्या पाण्यात भिजवून वहाव्यात. दूर्वा वहातांना पात्यांचा भाग आपल्याकडे आणि देठ श्री गणेश मूर्तीकडे असावे.

*श्री गणेशाला लाल फुले वहावीत !*
श्री गणेशाला तांबड्या जास्वंदाची फुले वहावीत. जास्वंद वा अन्य लाल फूल वाहतांना ‘देठ श्री गणेशाच्या चरणांकडे व तुरा आपल्याकडे येईल’, असे वाहावे. फुले वहातांना ती ८ किंवा ८ च्या पटीत आणि शंकरपाळ्याच्या आकारात वहावीत. शंकरपाळ्याच्या आकारात फुले वहातांना ‘दोन लहान कोन एका सरळ रेषेत देवतेच्या समोर येतील आणि मोठे दोन कोन दोन बाजूंना दोन रहातील’, अशा पद्धतीने फुले वहावीत.

*पत्री वहाणे*
शमीची आणि मंदारची पत्री वहावी. शमीमध्ये अग्नीचा वास आहे. आपली शस्त्रे तेजस्वी रहावीत म्हणून पांडवांनी ती शमीवृक्षाच्या ढोलीत ठेवली होती. मंदार हे वानस्पत्य रसायन आहे.

*प्रदक्षिणा घालणे*
श्री गणेशाला न्यूनतम ८ प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा जास्त घालायच्या असल्यास ८ च्या पटीत घालाव्यात.

*आरती करा*
श्री गणपतीची ही आरती समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे. ही आरती ऐकण्याने अन् तशा पद्धतीने म्हणण्याने जलद भावजागृती होण्यास साहाय्य होईल.

*नामजप करा*
भक्तीभाव लवकर निर्माण होण्यासाठी अन् देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे.

*संकष्टनाशन स्तोत्र*
हे स्तोत्र सोपे अन् प्रभावी आहे. या स्तोत्राची रचना देवर्षि नारद यांनी केली आहे. यात श्री गणेशाच्या बारा नावांचे स्मरण केले आहे. या स्तोत्राचे पठण सकाळी, माध्यान्ही आणि सायंकाळी केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

*श्री गणपति अथर्वशीर्षम्*
‘अथर्वशीर्ष’ यातील ‘थर्व’ म्हणजे ‘उष्ण.’ ‘अथर्व ‘ म्हणजे ‘शांती’ आणि ‘शीर्ष’ म्हणजे ‘मस्तक’. ज्याच्या पुरश्चरणाने शांती लाभते, ते म्हणजे ‘अथर्वशीर्ष’. हे स्तोत्र गणकऋषी यांनी रचले आहे. अथर्वशीर्षाचे पठण केल्याने सर्व विघ्ने दूर होतात आणि पापांपासून मुक्ती मिळते.

*गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात करा !*
उत्तरपूजेनंतर मूर्तीचे जलाशयात विसर्जन करतात. विसर्जनाला जातांना गणपतीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी आणि मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी. उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. वहात्या पाण्यामुळे पवित्रके सर्वदूर पोहोचतात आणि अनेकांना त्यांचा लाभ मिळतो. वातावरणही सात्त्विक होण्यास साहाय्य होते.

*श्री गणेश चतुर्थी निमित्त होणारे गैरप्रकार रोखून श्री गणेशाची कृपा संपादन करा !*
सुखकर्ता, विघ्नहर्ता अन् अष्टदिशांचा अधिपती म्हणजे श्रीगणपति ! वेदांच्या माध्यमातून धर्मशास्त्र सांगणारी ही देवता जशी विद्यापती आहे, तशीच ती असुरांचा नाश करणारीही आहे. म्हणूनच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने धर्माचरण शिकणे, तसेच गणेशोत्सवातील अपप्रकारांचे उच्चाटन करून धर्मरक्षणाचा संकल्प करणे, ही श्री गणेशाची खरी उपासना ठरेल !

*संकलक : श्री. तुळशीदास गांजेकर, सनातन संस्था, (संपर्क क्रमांक : ९३७०९ ५८१३२)*

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें