दिनांक : २०.४.२०२६
*फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावरील चिकन शॉप हटवा ! – फोंडा येथील धर्माभिमानी नागरिकांची शासनाकडे मागणी*
फोंडा, २० एप्रिल – फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावरील चिकन शॉप हटवण्याची मागणी फोंडा येथील धर्माभिमानी नागरिकांनी येथील उपजिल्हाधिकारी श्री. कौशिक आमोणकर यांच्याकडे २० एप्रिल या दिवशी एका निवेदनाद्वारे केली आहे. उपजिल्हाधिकारी श्री. कौशिक आमोणकर यांना निवेदन देतांना शिष्टमंडळामध्ये ‘इस्कॉन’चे ब्रह्मचारी सर्वश्री अर्जुन प्रियप्रभू, सत्यविजय नाईक, देवानंद सुर्लेकर, गौतम प्रभू, राजेंद्र देसाई, शिवदत्त नाडकर्णी आणि इतरांची उपस्थिती होती. उपजिल्हाधिकारी श्री. कौशिक आमोणकर यांनी फोंडा नगरपालिकेला कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. तसेच फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री. वीरेंद्र ढवळीकर यांनीही आवश्यक कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर ‘चिकन शॉप’ आहे. यामुळे मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी जाणार्यांना ‘चिकन शॉप’ची दुर्गंधी सहन करावी लागते. तसेच भाजीची विक्री होत असलेल्या ठिकाणीच चिकनचे शॉप असल्याने त्याचा भाजी विक्रीवरही परिणाम होत असतो. ‘भारतीय न्याय संहिते’चे कलम २९२ अंतर्गत ‘चिकन शॉप’ (कोंबडीची हत्या करून मांस विकरणारे दुकान) भाजी विक्री होत असलेल्या ठिकाणी असणे नियमबाह्य आहे. ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ संस्थेने स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर भाजी विक्री आणि चिकन यांसाठी निरनिराळे विभाग असावा असा नियम घातलेला आहे आणि या नियमाचे याठिकाणी उल्लंघन होत आहे. पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ नुसार सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे बंधनकारक आहे. चिकन शॉपमुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि दुकानात निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ यांमुळे सार्वजनिक स्वच्छता धोक्यात येत आहे. फोंडा नगरपालिकेने चिकन, मासळी आणि भाजी यांच्या विक्रीसाठी निरनिराळे विभाग केलेले आहेत. शासनाने भाजी मार्केच्या प्रवेशद्वारावरील चिकन शॉप हटवून त्याचे चिकन मार्केटमध्ये स्थलांतर करावे. या निवेदनाच्या प्रती फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष, फोंडा पोलीस ठाणे, अन्न आणि प्रशासन संचालनालय आणि आरोग्य खाते यांना देण्यात आले आहे.
आपले नम्र,
*फोंडा येथील धर्माभिमानी नागरिक*






