पेडणेच्या सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू : राजमोहन शेटये !

*पेडणेच्या सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू : राजमोहन शेटये !*

स्वतःच्या कर्तृत्वाने ओळख निर्माण करताना माणसांची मने जिंकणे, आपल्या मातीशी निष्ठा राखणे आणि समाजाच्या जडणघडणीत योगदान देणे, हेच खऱ्या यशाचे लक्षण असते. काही माणसे आपल्या कर्तृत्वाने मोठी होतात, तर काही माणसे आपल्या कर्तृत्वासोबत अनेकांना मोठे होण्याची प्रेरणाही देतात. पेठेचावाडा, कोरगाव, पेडणे येथील श्री. राजमोहन रामनाथ शेटये हे अशाच बहुआयामी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. ग्रामीण भागातून पुढे येत शिक्षण, कला, साहित्य, नाट्य आणि सामाजिक क्षेत्रांत स्वतःचा ठसा उमटवणारा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
एकत्रित कुटुंबव्यवस्था, पिढ्यान्‌पिढ्या जपलेली नाती, सामूहिक गणेशोत्सवाची परंपरा आणि आजोबांकडून मिळालेला समाजसेवेचा वारसा या संस्कारांतून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले. त्यामुळेच विविध क्षेत्रांत यश मिळवतानाही आपल्या गावाशी, माणसांशी आणि मातीशी असलेली नाळ त्यांनी कायम जपली. बी.एफ.ए. (अप्लाइड आर्ट), बी.ए., एम.ए. आणि बी.एड. अशी उच्च शैक्षणिक पात्रता असलेले राजमोहन शेटये व्हिस्काउंट ऑफ पेडणे हायस्कूलमध्ये कला व मराठी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेली अनेक वर्षे अध्यापन करताना विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि अभिव्यक्ती विकसित करण्यावर त्यांचा भर राहिला आहे. ‘चित्रकलेतून मराठी भाषा’ या उपक्रमात संसाधन व्यक्ती म्हणून शिक्षक या नात्याने त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. गोवा बोर्डाच्या डिजिटल शैक्षणिक उपक्रमांत, SCERT च्या प्रशिक्षण कार्यक्रमांत आणि विविध शिक्षक कार्यशाळांत संसाधन व्यक्ती म्हणून त्यांनी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना गोवा राज्य उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार २०२४-२५ ने त्यांना सन्मानित केले. चित्रकला हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष पैलू आहे. विविध चित्रप्रदर्शनांत सहभाग, उदयपूर येथील ऐतिहासिक बागोर की हवेली येथे कलाकृतींचे प्रदर्शन आणि पणजी येथे एकल चित्रप्रदर्शन अशा माध्यमांतून त्यांनी आपली कलात्मक ओळख जपली. जवळपास शंभर पुस्तकांची मुखपृष्ठे व चित्रांकन करून त्यांनी साहित्यविश्वालाही कलात्मक योगदान दिले आहे. कला व संस्कृती संचालनालय, गोवा सरकारचा ‘कला वृद्धी पुरस्कार २०२५-२६’ हा त्यांच्या कलाप्रवासातील महत्त्वाचा सन्मान आहे.
चित्रांप्रमाणेच शब्दांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. ‘स्पंदने मनाची’, ‘अस्वस्थ पेडणे’, ‘प्रकाश स्तंभ’ आणि ‘विचारवेल’ ही त्यांची चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सामाजिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण प्रश्नांवरील त्यांचे लेखन समाजाशी संवाद साधणारे आहे. ‘विचारवेल’ या ललित लेखसंग्रहाचे १० मे २०२६ रोजी पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेत प्रकाशन झाले. चाळीसहून अधिक मराठी नाटकांतील अभिनय आणि ‘रणसावट’ या कोकणी चित्रपटातील सहभागातून त्यांनी रंगभूमीशी असलेले नातेही जपले आहे. उत्कृष्ट निवेदक म्हणूनही त्यांची स्वतंत्र अशी ओळख आहे. त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा पैलू म्हणजे पेडण्याच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीतील सहभाग. तरुण वयात कोरगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविताना त्यांनी ग्रामविकासाच्या प्रश्नांवर काम केले. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून पंचवीसहून अधिक कला व सांस्कृतिक मंडळांच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला. श्री रघुगोनशेट सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे संस्थापक म्हणून स्थानिक युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. शिवशक्ती सामाजिक संघटनेचे ट्रस्टी म्हणूनही ते कार्यरत आहेत.
पेडण्याच्या साहित्यिक चळवळीला नवी उभारी देण्यात त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. दीर्घ खंडानंतर २८वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन पेडण्यात यशस्वीपणे आयोजित करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक साहित्यिक, कलावंत आणि संस्थांना एकत्र आणत संमेलनाची धुरा समर्थपणे सांभाळली. गोमंतक साहित्य सेवक मंडळ, पणजी या ज्येष्ठ संस्थेच्या कार्यकारिणीत सलग दुसऱ्यांदा निवड होऊन ते कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. कोरोना काळातही ऑनलाइन उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे कार्य सक्रिय ठेवण्यास त्यांचा वाटा मोठा होता. स्वर्गीय दत्ताराम काणेकर स्मृती नाट्यमहोत्सवाचे आयोजन करून स्थानिक व राज्यस्तरीय कलाकारांचा गौरव करण्याचा उपक्रमही त्यांनी यशस्वी केला. सध्या रंगकर्मी आणि त्रिसुपर्णा पेडणे या संस्थांचे अध्यक्ष, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष तसेच सम्राट क्लब इंटरनॅशनल, राज्य १ चे ब्लॉक अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. याशिवाय सम्राट क्लब पर्वरीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे, त्यांच्या कार्य काळात पहिल्या तीन क्रमांकात हा क्लब राहिला होता. व उत्कृष्ट क्लब म्हणून तृतीय पारितोषिक मिळवून दिले होते. संस्कृती नियतकालिकाचे माजी संपादक, रंगभूमी दिनाचे माजी अध्यक्ष आणि कला अकादमीच्या दृश्यकला सल्लागार समितीचे माजी कार्यकारी सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वी सांभाळल्या आहेत. भारत-चीन मैत्रीपूर्ण देवाणघेवाण अभ्यास दौऱ्यात गोव्याचे प्रतिनिधित्व आणि नवी दिल्ली येथील ‘हिंसामुक्त भारत’ राष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांच्या या कार्याला त्यामुळे व्यापक व्यासपीठ मिळाले. राज्य व जिल्हा युवा पुरस्कार, गोवा युवा गौरव, कला सन्मान, कलारत्न, कलाभूषण, आदर्श शिक्षक आणि आदर्श समाजसेवक पुरस्कार अशा विविध सन्मानांनी त्यांना आतापर्यंत गौरविण्यात आले आहे. मात्र, पुरस्कारांपेक्षाही विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत राहण्याची त्यांची वृत्ती आणि समाजातील सामान्य माणसांशी जपलेले नाते अधिक महत्त्वाचे आहे.
राजमोहन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची साधी राहणी, सरळ स्वभाव, मृदू हास्य आणि सर्वांना आपलेसे करण्याची हातोटी. जात, पंथ, धर्म यांपलीकडे जाऊन माणुसकीला महत्त्व देणारी त्यांची भूमिका अनेकांना भावते. पद हे प्रतिष्ठेचे नव्हे, तर समाजासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याचे माध्यम आहे, ही त्यांची कार्यपद्धती त्यांच्या नेतृत्वाचे वेगळेपण अधोरेखित करते. आज जीवनप्रवासाकडे पाहताना त्यांच्या वाटचालीत अनेक अनुभव, जपलेली नाती, सामाजिक योगदान आणि कर्तृत्वाचे विविध टप्पे दिसून येतात. कोरगावच्या मातीतील एका तरुणाने आपल्या गुणवत्तेच्या आणि मेहनतीच्या बळावर गोमंतकात निर्माण केलेली ओळख ही ग्रामीण भागातील नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, मोठे होण्यासाठी मोठ्या शहराची किंवा मोठ्या पार्श्वभूमीची गरज नसते; गरज असते ती मोठी स्वप्ने पाहण्याची, सातत्याने प्रयत्न करण्याची आणि आपल्या समाजाशी नाते जपण्याची.
पेडण्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासात त्यांच्या अनुभवाचा व नेतृत्वगुणांचा अधिक व्यापक उपयोग व्हावा, त्यांच्या कार्याला नवी क्षितिजे लाभावीत आणि त्यांनी आजवर जोडलेली माणसे त्यांच्या पुढील वाटचालीची ताकद ठरावीत, हीच अपेक्षा. पेडणेच्या मातीशी निष्ठा, कलेशी बांधिलकी आणि माणसांशी आपुलकी जपणाऱ्या या अस्सल भूमिपुत्राला सुवर्णमहोत्सवी ५०व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
त्यांच्या आयुष्यातील पुढील पर्व आरोग्य, आनंद, सर्जनशीलता, उत्तुंग स्वप्ने आणि समाजोपयोगी कार्याने समृद्ध होवो. त्यांच्या कर्तृत्वाला अधिक व्यापक संधी मिळोत आणि भविष्यात पेडण्याच्या नेतृत्वात त्यांचे योगदान अधिक प्रभावी ठरो, हीच सदिच्छा!

श्री. सखाराम (विजय) परब
वारखंड, पेडणे

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें