दिनांक : १८.१०.२०२६
_*हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला माझे सदैव सहकार्य असेल ! – जिल्हा पंचायत सदस्या सौ. अदिती गावडे*_
*‘मै हूँ दुर्गा’ अभियानाच्या समारोपप्रसंगी युवतींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित*
फोंडा, १८ ऑक्टोबर – हिंदु जनजागृती समितीने यंदाच्या नवरात्रोत्सवात युवतींमध्ये शौर्य जागृत करण्यासाठी ‘मै हूँ दुर्गा’ अभियान आरंभले होते. या अभियानाचा समारोप म्हार्दाेळ, फोंडा येथील श्री चंपी व्यंकटेश सभागृहात उत्साहात पार पडला. या सात दिवसीय अभियानाच्या अंतर्गत युवतींना स्वसंरक्षण, लाठी-काठी यांसारख्या शौर्यप्रशिक्षणाचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमाच्या समारोपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात जिल्हा पंचायत सदस्या सौ. अदिती गावडे यांनी ‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला *माझे* सदैव सहकार्य राहील’, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला म्हार्दाेळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. योगेश सावंत, ‘कृतार्थ म्हार्दाेळ’चे संस्थापक श्री. राजेंद्र देसाई, हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य संघटक श्री. सत्यविजय नाईक आणि युवा संघटक कु. सुरभी छत्रे यांची उपस्थिती होती.
या वेळी *जिल्हा पंचायत सदस्या सौ. अदिती गावडे म्हणाल्या,‘*‘आज युवतींवर होणारे आघात लक्षात घेता प्रत्येक युवतीने स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समिती अशा उपक्रमांच्या माध्यमातून हिंदूंमध्ये जागृती करण्याचे मोठे कार्य करत आहे. युवक-युवती यांना राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी संघटित करण्याचे काम हिंदु जनजागृती समिती करत आहे. या कार्याबद्दल मी हिंदु जनजागृती समितीची मनःपूर्वक आभारी आहे.” )
*म्हार्दाेळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. योगेश सावंत* उपक्रमाचे कौतुक करताना म्हणाले, “महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे. हिंदु जनजागृती समितीने यासाठी पुढाकार घेतला, ही अभिनंदनीय बाब आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण सर्वत्र युवतींपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.”
*‘कृतार्थ म्हार्दाेळ’चे संस्थापक श्री. राजेंद्र देसाई* म्हणाले, ‘‘स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा उपक्रम सातत्याने आणि सर्वत्र राबवणे आवश्यक आहे. तसेच प्रशिक्षण घेतल्यानंतर युवतींनी नियमित त्याचा सराव करून यामध्ये सातत्य राखणे महत्त्वाचे आहे.’’
*हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य संघटक श्री. सत्यविजय नाईक* म्हणाले, ‘‘युवतींमध्ये आत्मविश्वास, स्वसंरक्षणाची क्षमता आणि दुर्गादेवीचे शौर्यतत्त्व जागृत करण्यासाठी हे अभियान राबवण्यात आले. अधिकाधिक *युवतींनी* याचा लाभ घेणे आवश्यक आहे.’’ या अभियानाचा ३१ युवतींनी लाभ घेतला. अभियानामध्ये सहभागी झालेल्या युवतींना या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कु. मिताली सावंत यांनी केले.
आपला विश्वासू,
डॉ. मनोज सोलंकी, राज्य समन्वयक
हिंदु जनजागृती समिती
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)






