दिनांक : ०५.१०.२०२६
_*अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेचा उपक्रम*_
*दिपावलीच्या निमित्ताने राज्यस्तरीय ‘किल्ले बनवा स्पर्धा’*
पणजी, ५ ऑक्टोबर – युवकांमध्ये शौर्यजागृती करण्यासाठी आगामी दिपावलीच्या निमित्ताने राज्यस्तरीय ‘किल्ले बनवा स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेने येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला आयोजन समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र देसाई, सचिव सत्यविजय नाईक, खजिनदार अनिकेत देसाई, तसेच सुजय देसाई, मनोज गावकर, इच्छित फळदेसाई, जयेश थळी आणि सूचेंद्र अग्नि यांची उपस्थिती होती.
संघटनेचे पदाधिकारी पत्रकार परिषदेत म्हणाले,‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले आणि जिंकलेले गडदुर्ग हे आज प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी तसेच शौर्य, पराक्रम अन् बलिदान यांची साक्ष देणारे आहेत. हा शौर्यशाली इतिहास सर्व युवकापर्यंत पोचला पाहिजे. यासाठी गोव्यातील शिवप्रेमी, इतिहास आणि कलाप्रेमी यांनी एकत्र येऊन ‘अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटना’ या बॅनरखाली दीपावलीच्या निमित्ताने ‘राज्यस्तरीय किल्ले बनवा’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटना, अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज आणि पुरातत्त्व संचालनालय, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ‘किल्ले बनवा स्पर्धा’ ही समुदाय आणि वैयक्तिक घरगुती स्तर, अशा दोन विभागांमध्ये घेतली जाणार आहे. समुदाय स्तरावरील स्पर्धा जिल्हास्तरावर (उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि कुशावती), तर वैयक्तिक घरगुती स्तरावरील स्पर्धा तालुकास्तरावर घेतली जाणार आहे. बक्षिसे देखील जिल्हा आणि तालुका स्तरांवर देण्यात येणार आहे. समुदाय स्तरावरील स्पर्धेसाठी किल्ल्याचा किमान आकार ४ चौ.मी. असणे आवश्यक आहे. समुदाय स्तरावरील स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५० सहस्त्र रुपये, दुसरे ३० सहस्त्र रुपये, तिसरे २० सहस्त्र रुपये आणि प्रत्येकी ५ सहस्त्र रुपये अशी ५ सन्माननीय पारितोषिके देण्यात येणार आहे. समुदाय स्तरावरील स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क प्रत्येकी १०० रुपये आहे. वैयक्तिक घरगुती स्तरावरील स्पर्धेसाठी किल्ल्याचा कमाल आकार १ चौ.मी. असणे आवश्यक आहे. वैयक्तिक घरगुती स्तरावरील स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५ सहस्त्र रुपये, दुसरे ४ सहस्त्र रुपये, तिसरे ३ सहस्त्र रुपये, तर प्रत्येकी २ सहस्त्र रुपयांची ३ सन्माननीय पारितोषिके देण्यात येणार आहे. वैयक्तिक घरगुती स्तरावरील स्पर्धेसाठी प्रत्येकी ५० रुपये शुल्क आहे. नोंदणीसाठी अंतिम तारीख ७ नोव्हेंबर, किल्ला तयार करण्याची अंतिम तारिख १४ नोव्हेंबर आणि परीक्षणाची सुरुवार १५ ते २१ नोव्हेंबरया दिवशी होणार आहे. नोंदणी करण्यासाठी सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा. संपर्कासाठी श्री. सत्यविजय नाईक (९१५८९ ५४४५५) किंवा श्री. सुजय देसाई (९६६५२ १६५५१).
आपली विश्वासू,
*अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटना*
(संपर्कासाठी ९१५८९ ५४४५५/ ९६६५२ १६५५१)






