सूर्य नमस्कार: १२ सोप्या मुद्रा ज्या कुंडलिनी शक्ती जागृत करू शकतात
!
दररोज सकाळी लाखो लोक योगाभ्यासाचा एक भाग म्हणून सूर्य नमस्कार घालतात. परंतु हा प्राचीन व्यायाम प्रकार केवळ शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यापुरताच मर्यादित आहे का?
शास्त्र काय सांगते?
योगशास्त्र आणि आयुर्वेद यांनुसार, सूर्य नमस्काराच्या वेळी शरीराची पुढे–मागे हाेणारी हालचाल, लयबद्ध श्वासोच्छ्वास आणि मंत्रांचा उच्चार—या सर्वांमुळे शरीरातील ‘कुंडलिनी चक्रे‘ सक्रिय आणि संतुलित होतात. इतकेच नाही तर, हे पाठीच्या कण्याच्या मुळाशी असलेली सुप्त ‘कुंडलिनी शक्ती’ जागृत करून तिला ‘सुषुम्ना नाडी’ द्वारे वरच्या दिशेने नेण्यास मदत करते, ज्यामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.
प्राचीन ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम
नुकतेच महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय (MAV) च्या संशोधन गटाने सूर्य नमस्काराच्या कुंडलिनी चक्रांवरील परिणामाचा अभ्यास कऱण्यासाठी एक प्रयोग केला.
यासाठी रशियन शास्त्रज्ञ डॉ. कॉन्स्टँटिन कोरोटकोव्ह आणि त्यांच्या गटाने विकसित केलेल्या ‘बायो–वेल जीडीवी‘ (गॅस डिस्चार्ज व्हिज्युअलायझेशन) उपकरणाचा वापर केला. हे उपकरण व्यक्तीच्या बोटांमधून निघणारे सूक्ष्म प्रकाश कण (फोटॉन) ग्रहण करून त्याच्या ऊर्जा क्षेत्राचे (Energy field) आणि चक्रांच्या स्थितीचे विश्लेषण करते.
हा प्रयोग MAV चे एक साधक डॉ. भिकाजी भोसले (वय ७० वर्षे) यांच्यावर करण्यात आला. त्यांनी सूर्याच्या बारा पारंपरिक नावांच्या उच्चारासह सूर्य नमस्काराची १२ आवर्तने करण्यापूर्वी (चित्र १) आणि केल्यानंतरच्या (चित्र २) नोंदी (रीडिंग) घेण्यात आल्या. या नोंदी उपकरणातून मिळालेल्या पुढील २ कुंडलिनी चक्रांच्या चित्रांमधून लक्षात घेऊ शकतो.
सूर्य नमस्कारा नंतर चक्रांमधे दिसून आलेले उल्लेखनीय बदल
सहा चक्रांचा आकार वाढला: सूर्य नमस्कार घातल्यानंतर त्यांच्या कुंडलिनी चक्रांना ऊर्जा प्राप्त झाली आणि ती अधिक प्रभावीपणे कार्य करण्यास सक्षम झाली.
चार चक्रे सुषुम्ना नाडीच्या लगत आली: यावरून चक्रांची ईश्वरी तत्त्व ग्रहण करण्याची क्षमता वाढली, हे लक्षात येते.
तीन चक्रे निष्क्रिय झाली: हे अंतर्मुखता वाढल्याचे दर्शवते, जे ‘मनोलय’ हाेण्यास मदत करते.
विशुद्ध चक्राच्या आकारात थोडी घट दिसून आली: डॉ. भोसले यांनी सूर्य मंत्रांचा तोंडाने उच्चार केला होता. वाणी विशुद्ध चक्राशी संबंधित असल्याने, या चक्रावर सर्वाधिक आध्यात्मिक उपाय (Spiritual healing) झाले, ज्यामुळे त्यामध्ये साठलेली त्रासदायक ऊर्जा कमी झाली.
एक सोपा; परंतु शक्तिशाली सर्वंकष व्यायाम प्रकार !
सूर्य नमस्काराचा प्रभाव केवळ शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यापुरताच मर्यादित नाही, तर ही एक सूक्ष्म वैज्ञानिक प्रक्रिया आहे जी तुमची कुंडलिनी शक्ती सक्रिय आणि संतुलित करू शकते. ताणतणाव, चिंता आणि हानिकारक किरणोत्सर्गाच्या या युगात, हा प्राचीन योग प्रकार जीवनाला दैवी ऊर्जेने भारीत करण्यासाठी एक सोपा, पण शक्तिशाली उपाय आहे, हे या प्रयोगातून स्पष्ट झाले.
या आंतरराष्ट्रीय योगदिनी, सूर्यनमस्काराच्या माध्यमातून आपण दररोज वैश्विक आध्यात्मिक सकारात्मक ऊर्जेशी जोडले जाण्याचा संकल्प करूया!
— डॉ. (सौ.) नंदिनी दुर्गेश सामंत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.






