अक्षय्य (अक्षय्य) तृतीयेमागील अध्यात्मशास्त्र* *या वर्षी १९ एप्रिल २०२६ या दिवशी अक्षय्य तृतीया आहे. त्यामागील अध्यात्मशास्त्र सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात आपण समजून घेऊया.

_

दिनांक : १६.४.२०२६

*अक्षय्य (अक्षय्य) तृतीयेमागील अध्यात्मशास्त्र*

*या वर्षी १९ एप्रिल २०२६ या दिवशी अक्षय्य तृतीया आहे. त्यामागील अध्यात्मशास्त्र सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात आपण समजून घेऊया.*

श्रीकृष्ण युधिष्ठिराला अक्षय्य तृतीयेचे महत्व सांगताना म्हणतात, या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते. असा उल्लेख मदनरत्न या ग्रंथांत आढळतो.

*अक्षय तृतीया या दिवसाला `साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’ मानले जाणे*
‘अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसर्‍या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय (अक्षय्य) तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला, तरी संधीकालामुळे त्याचा परिणाम २४ घंट्यांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो; म्हणूनच (अक्षय्य) तृतीया या दिवसाला `साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’ मानले जाते.

*अवतार होणे*
अक्षय (अक्षय्य) तृतीया या तिथीवरच हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला. या तिथीला ब्रह्मा आणि श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते. यावरून अक्षय तृतीया या तिथीचे महत्त्व लक्षात येते.’

*धर्मकृत्यांचा अधिक लाभ होणे*
‘या तिथीला विष्णुपूजा, जप, होमहवन, दान आदी धर्मकृत्ये केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो’, असे मानले जाते.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणार्‍या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणार्‍या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, असे मानले जाते.

श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तीभावाने पूजन करावे. होमहवन आणि जपजाप्य करण्यात काळ व्यतीत करावा.

*अक्षय तृतीया हा सण साजरा करण्याची पद्धत*
‘कालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतियांना नेहमीच पवित्र वाटतो; म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत. या दिवसाचा विधी असा आहे – पवित्र जलात स्नान, श्रीविष्णूची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण. या दिवशी अपिंडक श्राद्धकरावे आणि ते जमत नसेल, तर निदान तिलतर्पण तरी करावे.

*उदकुंभाचे (उदककुंभाचे) दान*
या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे. उदककुंभालाच ‘सर्वसमावेशक स्तरावरील निर्गुण पात्र’ असे संबोधले जाते. उदककुंभाचे दान करणे, म्हणजेच स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहसदृश, तसेच कर्मसदृश वासनांच्या स्थूल, तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणे आणि अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्तीविरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उदककुंभायोगे या सर्व वासना पितर अन् देव यांच्या चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे. पितरांच्या चरणी उदककुंभ दान दिल्याने पितर मानवयोनीशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात. देवाचा कृपाशीर्वाद हा आपल्या प्रारब्धजन्य सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करत असल्याने सूक्ष्म कर्मजन्य वासना देवांच्या चरणी या दानाकरवी अर्पण केल्या जातात.

*अक्षय तृतीयेचे शास्त्र :* अक्षय तृतीया या दिवशी ब्रह्मांडात अखंड रूपातील, तसेच एकसमान गतीजन्यता दर्शवणार्‍या सत्त्व-रज लहरींचा प्रभाव अधिक प्रमाणात असल्याने या लहरींच्या प्रवाहायोगे पितर आणि देव यांना उद्देशून ब्राह्मणाला केलेले दान पुण्यदायी आणि मागील जन्माच्या देवाणघेवाण हिशोबाला धरून कर्म-अकर्म करणारे ठरत असल्याने या कधीही क्षय न होणार्‍या लहरींच्या प्रभावाच्या साहाय्याने केलेले दान महत्त्वाचे ठरते.’

*तिलतर्पण करणे*

‘तिलतर्पण म्हणजे देवता आणि पूर्वज यांना तीळ अन् जल अर्पण करणे. तीळ हे सात्त्विकतेचे प्रतीक आहे, तर जल हे शुद्ध भावाचे प्रतीक आहे. देवाजवळ सर्वकाही आहे. त्यामुळे आपण त्याला काय अर्पण करणार ? तसेच ‘मी देवाला काहीतरी अर्पण करतो’, हा अहंही नको. यासाठी तीळ अर्पण करतांना ‘देवच माझ्याकडून सर्वकाही करवून घेत आहे’, असा भाव ठेवावा. यामुळे तिलतर्पण करतांना साधकाचा अहंन वाढता त्याचा भाव वाढण्यास मदत (साहाय्य) होते. तिलतर्पण करणे म्हणजे देवतेला तीळांच्या रूपाने कृतज्ञतेचा आणि शरणागतीचा भाव अर्पण करणे होय.

*धनाचे दान* : सत्पात्रे दान करावे. संत, धार्मिक कार्य करणार्‍या व्यक्ती, धर्मप्रसार करणार्‍या आध्यात्मिक संस्था, धर्माविषयीचे उपक्रम आदींना वस्तू वा द्रव्य रूपाने दान करावे.

*तनाचे दान* : धर्माविषयीच्या उपक्रमांत सहभागी होणे, हे तनाचे दान होय. यासाठी देवतांचे विडंबन, धार्मिक उत्सवांतील अपप्रकार इत्यादी रोखावे.

*मनाचे दान* : कुलदेवतेचा जप करणे, तिला प्रार्थना करणे यांद्वारे मन अर्पण (दान) करावे.

*मृत्तिका पूजन:* ‘सदोदित कृपादृष्टी ठेवणार्‍या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी यांची प्राप्ती होते. अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञता भाव ठेवून मृत्तिकेची उपासना करण्याचा दिवस.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे अक्षय (अक्षय्य) तृतीया या दिवसापर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण करावे. या दिवशी मृत्तिकेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून पूजन करून आळी घालावीत आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास प्रारंभ करावा. या दिवशी पेरणी केल्याने त्या बियाण्यांपासून विपुल धान्य पिकते आणि बियाण्याचा कधीही तुटवडा होत नाही. त्यामुळे वैभव प्राप्त होते.

*वृक्षारोपण*

अक्षय तृतीया या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात, तसेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही.’

*हळदीकुंकू*

‘स्त्रियांसाठी अक्षय तृतीया हा दिवस महत्त्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या चैत्रगौरीचे या दिवशी त्यांना विसर्जन करायचे असते. त्यानिमित्त त्या हळदीकुंकूही करतात.’

*संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’*
*संकलक – श्री. तुळशीदास गांजेकर, सनातन संस्था,*
(संपर्क क्रमांक : ९३७०९ ५८१३२)

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें