दिनांक : ०९.०४.२०२६
*_अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट!_*
*१० वर्षांत काशी आणि मथुरा मुक्त होतील!* – अधिवक्ता आलोक कुमार, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, विश्व हिंदु परिषद
*फोंडा (गोवा)* – काशी आणि मथुरा या धार्मिक स्थळांची तथ्ये आणि पुरावे सर्व हिंदूंच्या बाजूंनी आहेत. न्यायालयात याविषयी लढा चालू आहे. एक अधिवक्ता म्हणून मी सांगेन की, ज्याप्रमाणे अयोध्येतील श्रीराममंदिर मुक्त झाले, त्याप्रमाणे येत्या १० वर्षांत काशी आणि मथुराही मुक्त होतील, *असे स्पष्ट प्रतिपादन विश्व हिंदु परिषदेचे (विहिंपचे) आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता आलोक कुमार यांनी सनातन संस्थेच्या रामनाथी, फोंडा, गोवा येथील आश्रमाच्या भेटीच्या वेळी केले.* सनातनच्या आश्रमाला त्यांनी विहिंपच्या ‘संत दर्शन आणि संवाद’ या उपक्रमांर्तगत भेट दिल्यानंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
*…येणारी शताब्दी हिंदूंची असेल !*
अधिवक्ता आलोक कुमार पुढे म्हणाले, ‘‘येणारी शताब्दी हिंदूंची असेल. यापूर्वी रशियाची होती, आता अमेरिकेची आहे; पण ती संपत चालली आहे. कुठल्याही शताब्दीचे परिवर्तन हे ३० ते ४० व्या शतकात होते. त्यानुसार आता येणारी शताब्दी ही हिंदूंची, भारताची असेल. तसे चित्रही पहायला मिळत आहे. देशभरातील सर्व छोट्या-मोठ्या हिंदु संघटना आपापल्या परीने हिंदु धर्मासाठी कार्य करत आहेत. विहिंपकडूनही घरवापसीचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे. सध्या कुटुंबात पूर्वीसारखे संस्कार मिळत नसल्याने, तसेच कुटुंबाच्या सदस्यांतील एकमेकांशी संवाद हरवल्याने कौटुंबिक हानी होत आहे. हे ओळून विहिंप कौटुंबिक संवाद साधला जावा, यासाठीही उपक्रम राबवत आहे. आम्ही वेदांचाही प्रसार करत आहोत.’’
*विहिंपचे कार्य स्थुलातील, तर सनातनचे सूक्ष्मातील !*
‘सूक्ष्म जगताचे अध्ययन आणि मार्गदर्शन करणे, हे सनातन संस्थेचे वैशिष्ट्य आहे. हे कार्य करता करता परब्रह्माशी एकरूप होण्याची शिकवण आहे. विश्व हिंदु परिषद प्रत्यक्ष जगात कार्य करणारी संघटना आहे, तर सनातन संस्थेचे कार्य परजगातील (सूक्ष्मातील) आहे’, *असे गौरवोद्गारही अधिवक्ता आलोक कुमार यांनी सनातन संस्थेविषयी येथे काढले.*
या वेळी विहिंपच्या कोकण प्रांताचे प्रमुख श्री. परशुराम दुबे, विहिंपचे गोवा प्रमुख श्री. प्रवास नाईक, विभागमंत्री श्री. मोहन आमशेकर, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे धार्मिक विभाग प्रमुख श्री. संजय मुरदाळे, सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे, सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी श्री. राजहंस यांनी श्री. आलोक कुमार यांना सनातनच्या आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी श्री. वीरेंद्र मराठे यांनी अधिवक्ता आलोक कुमार यांचा शाल, श्रीफळ आणि सनातनचे ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. यासह अन्यही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गोव्यातील चिन्मय मिशनचे प्रमुख स्वामी सुघोशानंद, विहिंपच्या कोकण प्रांताचे धर्माचार्य संपर्क प्रमुख श्री. चंद्रप्रकाश पांडे, जिल्हा धर्माचार्य संपर्क प्रमुख श्री. पांडुरंग थोरात, श्री. नवलकिशोर पुराणिक, विभाग संघटन मंत्री श्री. बिस्वेंदु विश्वास, विहिंपचे गोवा विभाग मठ-मंदिर प्रमुख श्री. शाम नाईक, धर्माचार्य संप्रदाय प्रमुख श्री. विश्वजी मेवालाल, प्रांत सदस्य श्री. नितीन भोसके, माध्यमप्रमुख श्री. ब्रिजेश शुक्ला, अधिवक्ता गणेश सुर्वे, विहिंपच्या कोकण प्रांताच्या साध्वी प्रमुख शुभांगी जोशी यांची उपस्थिती होती.
आपला नम्र,
*श्री. चेतन राजहंस,*
राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
(संपर्क : ७७७५८ ५८३८७)






