वास्को ता, १० (प्रतिनिधी) :
मराठी रंगभूमीवरील नाट्य कला जिवंत ठेवण्यासाठी ओम श्री विष्णू कला सांस्कृतिक संस्थे सारख्या इतर संस्थांनीही पुढाकार घ्यावा व आजच्या नविन पिढीतील नाट्य कलाकार, लेखक, दिग्दर्शक घडवावे यासाठी गोवा मराठी अकादमी सहकार्य करण्यास सदैव तत्पर आहे, असे आवाहन उद्योजक तथा समाजसेवक चंद्रकांत गवस यांनी केले.
ओम श्री विष्णु कला सांस्कृतिक संस्थेतर्फे श्री राष्ट्रोळी जय संतोषी माता संस्थेच्या वार्षिकोत्सवा प्रित्यर्थ संस्थेतर्फे निर्मित आणि ध्रुव कुडाळकर लिखित संगीत “दैव” या नवीन नाटकाच्या उद्घाटन तसेच प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षस्थानी बोलत होते. ओम श्री विष्णू कला सांस्कृतिक संस्था नवे वाडे वास्को तर्फे श्री राष्ट्रोळी जय संतोषी मातेच्या वार्षिकोत्सवा प्रित्यर्थ स्वर्गीय मंदाताई बांदेकर यांच्या स्मरणार्थ एन. आर. बी. ग्रुप बांदेकर तसेच वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, उद्योजक विभव जोशी यांच्या सौजन्याने ओम श्री विष्णू कला सांस्कृतिक संस्था निर्मित आणि ध्रुव कुडाळकर लिखित संगीत “दैव” या नवीन नाटकाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक तथा समाजसेवक उमेश साळगावकर, नाटकाचे लेखक ध्रुव कुडाळकर, श्री राष्ट्रोळी जय संतोषी माता संस्थानचे अध्यक्ष तुळशीदास पटेकर, खास निमंत्रित एकनाथ गोवेकर, पत्रकार भारत बेतकेकर, प्रदीप नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना गवस म्हणाले कि, ओम श्री विष्णु कला सांस्कृतिक संस्था गेली कित्येक वर्षे नाट्य कला, भजन कलेशी निगडीत असून अशा अनेक सांस्कृतिक उपक्रमातून मराठी रंगभूमीला न्याय देण्याचे महान कार्य ही संख्या करत आहे. याव्यतिरीक्त आपल्या संस्कृतीशी नाळ जोडलेल्या कलाकारांचा सन्मान करून त्यांच्या कार्याची पोचपावती देत आहे. ही पण अभिमानास्पद बाब आहे असे ते शेवटी म्हणाले.
प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना उद्योजक उमेश साळगावकर यांनी आज मराठी रंगभूमीवरील नाट्य कलेला उतरती कळा लागली असून अशा परीस्थीतीत ओम विष्णू कला सांस्कृतिक संस्था नवसंजीवनी देण्यास पुढे सरसावली आहे ही कौतूकाची गोष्ट आहे. त्यांनी आपले कार्य असेच चालू ठेवावे, असे सांगून त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले.
उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष दामोदर कुडाळकर यांनी तर आभार प्रदर्शन महेश नावेलकर यांनी केले. तद्नंतर “दैव” हा नाट्य प्रयोग सादर करण्यात आला. संगीत “दैव” या नाटकात चंद्रकांत परब, मनोज वळवईकर, रत्नादीप धारगळकर, अभय पेडणेकर, महेश चव्हाण, दामोदर कुडाळकर, नंदू रेडकर, विनायक रेडकर, शुभा शिरोडकर आदी कलाकारांनी भाग घेतला.
फोटो : संगीत “दैव” या नवीन नाटकाच्या उद्घाटन तसेच प्रकाशन सोहळ्यात उपस्थित मान्यवर नाट्य पुस्तकाचे विमोचन करताना.






