बालकांच्या आहार संतुलित असावा – डॉ. गुरुदास भालचंद्र नाटेकर

बालकांच्या आहार संतुलित असावा

– डॉ. गुरुदास भालचंद्र नाटेकर

आजच्या अत्याधुनिक युगात बालकवर्ग तसेच लहान मुले टी.व्ही., मोबाइल इत्यादी प्रगत उपकरणांच्या सततच्या सहवासाने, त्यांच्या अतिवापराने भलत्याच मार्गांकडे वळलेली आहेत असे नाइलाजाने म्हणावे लागते. त्या उपकरणांमुळेच त्यांच्या अभिरुचीत, त्यांच्या जीवनपद्धतीत आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. ह्या एकंदर परिस्थितीला केवळ मुले जबाबदार नसून, त्यांचे पालकच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बव्हंशी जबाबदार आहेत. ह्याबाबत मुलांना दोष देऊन चालणार नाही; कारण, पालकांची जशी कृती असते, त्यांची जशी आचार-विचार पद्धती असते, त्याचेच अनुकरण मुले करीत असतात.

ह्यासंदर्भात आपल्या दैनंदिन जीवनातील साधेसुधेच उदाहरण घेऊ या. बऱ्याचदा पालक शहरात जात असताना प्रवेशनिषिद्ध मार्गातून अर्थांत ‘नो एंट्री’मधून प्रवेश करीत असतात अथवा डोक्यावर हेल्मेट परिधान न करता तेजगतीने वाहते चालवत असतात. साहजिकच, असे केले तर काही बिघडत नाही, अशी लहान मुलांची मनोधारणा बनते. पुढे मग तीच मुले वयात आल्यानंतर वाहने चालवताना स्वत:च्या पालकांचेच अनुकरण करतात आणि दुर्दैवाने ती मुले अपघातांत सापडतात. सांगायचे तात्पर्य म्हणजे, पालकांचे अनुकरण करीत मुलेही चुकीच्या मार्गाकडे वळत असतात. ह्या बाबतीत पालकांनी स्वत:ची नैतिक जबाबदारी ओळखून चांगल्या कार्यपद्धतीचा अवलंब केल्यास ती मुले सुसंस्करित होऊ शकतात व मुलांच्या भावी आयुष्यातील अनुचित घटना-प्रसंग टाळले जाऊ शकतात; ह्याचे आत्मभान पालकांना असणे गरजेचे आहे. अशा पद्धतीच्या छोट्या-मोठ्या प्रसंगांतूनच लहान मुलांचा मन:पिंड घडत असतो, ह्याची पालकांनी सदैव जाणीव ठेवणे नितांत गरजेचे आहे.

मुलांचे संगोपन, त्यांचा आहार-विहार हे सारे काम प्रामुख्याने सर्वसाधारणपणे पित्याऐवजी माताच सांभाळत असते. कारण, बहुतांश कुटुंबांत मुलांचा पिता नोकरी-व्यवसाय करीत असतो, तर माता गृहिणी असते. माता नोकरी-व्यवसाय करणारी आणि पिता घरसंसार साभाळणारा, अशी उदाहरणे अत्यंत अपवादात्मक आहेत. अशा ह्या एकंदर सामाजिक स्थितीत. स्वत:चे मूल शारीरिकदृष्ट्या धष्टपुष्ट, आरोग्यसंपन्न असावे अशी प्रत्येक मातेची इच्छा-आकांक्षा असते. आरोग्यासाठी मांसाहारच चांगला, अशी तीची चुकीची समजून असते. ती माता मग स्वत:च्या मुलाची शारीरिक स्थिती चांगल्यापैकी असावी ह्या हेतूने मुलाला अगदी सुरुवातीपासूनच मासे, चिकन-मटन भरवत असते. त्यामुळे होते असे, की त्यांना मासे व चिकन-मटनची जणू कायमची संवयच होऊन जाते. त्याशिवाय त्या मुलांचे पानही हालत नाही. जीवनसत्त्व वाढवणारी कडधान्ये, भाज्या असे शाकाहारी खाद्यपदार्थ खाण्याकडे त्यांचा कल असत नाही. त्या प्रकारचे पदार्थ दिले की ती मुले नाक मुरडतात. अगदी गोडधोड शाकाहारी खाद्यजिन्नसांकडेही ती मुले दुर्लक्ष करीत असतात. कारण, आंबट-तिखट मांसाहारी खाद्यजिन्नस सेवन करण्याची त्यांना चटक लागलेली असते. त्यामुळे, बऱ्याचदा एखाद्या सण-उत्सवाच्या निमित्ताने अथवा कौटुंबिक रीतिरिवाजानुसार सोमवार, गुरुवार इत्यादी दिवशी घरात शिजवले जाणारे शाकाहारी खाद्यजिन्नस खाताना ती मुले तोंड वाकडे करीत असतात. काही मुले त्या दिवशी काहीच न खाता जणू एका परीने ‘उपवास’च करीत असतात. मग, त्या मुलांनी अन्नभक्षण करावा ह्यासाठी पालकांना त्यांची मनधरणी करावी. लागते. परंतु, ती मुले त्या दिवशी घरात मांसाहारी अन्न उपलब्ध नसल्याने काहीही न खाता उपाशीच राहतात अथवा दुकानावरून आणलेले चिप्स, बिस्किट वगैरे खाऊन कशीबशी वेळ मारून नेतात.

वास्तविक, लहान मुलांना शाकाहाराची संवय लहानपणीच लावली तर ती मुले पुढील आयुष्यातही शाकाहारी खाद्यजिन्नस आवडीने खात असतात. अशी आवड निर्माण करण्याच्या बाबतीत पालकवर्ग कुठेतरी कमी पडत आहे, असे माझे प्रांजळ मत आहे. ह्यासाठी सर्वप्रथम पालकांच्या मानसिकतेत बदल होणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे पालकांच्या मनांत चुकीच्या संकल्पनांनी घर केलेले असते आणि त्यामुळेच असे घडते. मांसाहारी खाणे म्हणजे प्रतिष्ठितपणा, असा त्यांचा गैरसमज असतो.

शाकाहाराऐवजी मुलांना कायम मांसाहारी भोजन व अन्य तत्सम खाद्यघटकांची चटक लागण्यास अनेक कारणे जबाबदार आहेत. त्यापैकीच एक कारण म्हणजे, इतर समवयस्क मुलांचे अनुकरण. शेजारची मुले, नात्यातील इतर मुले, शाळेतील मुले काय खातात त्यानुसार आपल्या घरातील मुलेही अनुकरण करायला लागतात. त्याशिवाय, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील कार्यक्रम, चित्रपटांतील घटना, जाहिराती, मोबाइलवरील मजकूर इत्यादींना मुले बळी पडत असतात. मुलांना घराबाहेरचे चटकदार, चटपटीत, मसालेदार खाद्यजिन्नस, मांसाहार कधीच देऊ नये असे मी मुळीच म्हणणार नाही. परंतु, त्याचे एक विशिष्ट प्रमाण हवे. सर्व प्रकारचे पोषक खाद्यपदार्थ त्यांनी खायला हवेत. तेव्हाच तो आहार समतोल होईल. विशेषत: घराबाहेरून मागवलेले पिझ्झा, जंक फूड इत्यादी प्रकर्षाने टाळून, विविध जीवनसत्त्वांनी युक्त असलेल्या भाज्या, कडधान्ये वगैरेंकडे मुले कशी आकृष्ट होतील, हे पालकांनी पाहावे. हा समतोल बिघडला तर मुलांच्या आरोग्यविषयक तक्रारी वाढण्याचा धोका आहे.

मुलांच्या आकार-विहारासंदर्भात त्यांची मानसिकता बदलण्यात, त्यांचा मन:पिंड घडवण्यात पालकांबरोबरच शिक्षकांचेही योगदान महत्त्वपूर्ण ठरत असते. मुले शिक्षकांपेक्षा पालकांच्या सहवासात अधिक काळ असतात, हे जरी सत्य असले तरी पालकांपेक्षा शिक्षकच ह्यासंदर्भात अधिक प्रभावी भूमिका बजावत असतात. ज्ञानासंदर्भात, नीतिमूल्यांसंदर्भात मुलांचा पालकांपेक्षा शिक्षकांवर ठाम विश्वास असतो, ही वस्तुस्थिती आहे. शिक्षकांनी सांगितलेले शंभर टक्के बरोबर असते अशी मुलांची मनोधारणा असते. एखाद्या वेळी शिक्षकांनी सांगितलेले चुकीचे असले आणि पालकांनी त्यात दुरुस्ती करून खरी माहिती दिली तरी मुले पालकांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायला तयार नसतात. शिक्षकाचेच बरोबर असे मुले ठामपणे सांगत असतात. त्यामुळे, पालकांनीही आहारविराविषयी मुलांचे प्रबोधन करणे अत्यावश्यक आहे.
कायम मांसाहार सेवन करणे आरोग्याला अपायकारक असे आहे, हे मुलांना उदाहरणांसह पटवून दिले पाहिजे. तरच ती मुले तुमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतील. त्याबाबत मुलांची मानसिकता बदलली पाहिजे हा त्यासंदर्भातील हेतू असावा. आपल्या भारतात जीवनभर शाकाहार सेवन करणारी कुटुंबे निम्म्याअधिक संख्येने आहेत. त्यांना कोणताही आजार सहसा जडत नाही. अगदी धष्टपुष्ट स्थितीत ती माणसे दीर्घ काळ जीवन जगत असतात. त्याशिवाय, शाकाहारी माणसे सहसा व्यसनांच्या नादी लागत नाहीत. कारण, त्यांच्या जीवनात शाकाहारामुळे सात्त्विकता निर्माण होत असते. ह्या उलट, मांसाहार सेवन करणाऱ्या माणसांना अनेकदा आरोग्यविषयक तक्रारींनी तसेच कित्येक व्याधींनी कवटाळलेले असते. तसेच, सततच्या मांसाहार सेवनाने ती माणसे तामसी प्रवृत्तीकडे वळतात. मद्य, सिगारेट, अमली पदार्थ अशा विविध व्यसनांकडे मांसाहारी माणसे वळतात. त्यामुळे त्यांच्या एकंदर आयुष्याचाही विनाश होत असतो. मांसाहार हे जणू ‘स्लो पॉइजनिंग’च आहे.

स्वत:ची मुले कधीच शाकाहारी जेवण घेत नाही, असे अभिमानाने सांगणारे कित्येक पालक आपल्याला दैनंदिन जीवनात भेटत असतात. असे सांगण्यात त्या पालकांना प्रतिष्ठा वाटत असते; परंतु, वास्तविक ती त्यांची कमजोरी, मजबुरी असते. तो त्यांचा खोटा अभिनिवेश असतो. आमचे मूल चिकन व मांस-मटनाशिवाय काही खातच नाही, असे सांगणाऱ्या पालकांची खरे तर कीव करावीशी वाटते. अशा पालकांना मी सांगू इच्छितो, की त्यांच्या मुलांना त्यांनी एक दिवस उपाशी ठेवून सायंकाळी अन्य काहीही न देता शाकाहारीच खाद्यजिन्नस द्यावेत. त्या वेळी त्या मुलांना शिळी भाजी-भाकरी जरी दिली तरी ती मुले मुकाट्याने खातील. अशाने त्यांना शाकाहाराची संवय हळूहळू होईल.

गेल्या अनेक वर्षांपासून मुलांना विद्यालयांमधून माध्यान्ह आहार योजनेच्या अंतर्गत विविध खाद्यजिन्नस पुरवले जातात. त्यात शाकाहाराचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो, ही त्यातल्या त्यात समाधानकारक गोष्ट आहे. बहुतांश मुले अगदी चवीने ते खाद्यजिन्नस खातात. काही ठिकाणी माध्यान्ह आहार व्यवस्थित शिजवला जात नाही, अन्नपदार्थांचा दर्जा राखला जात नाही, अशाही तक्रारी असल्या तरी बहुतांश ठिकाणी चांगल्यापैकी ही योजना चालते असे शिक्षक व पालकांकडून ऐकायला मिळते. काही मुले असा माध्यान्ह आहार कदापि स्विकारत नाहीत व घरातून आणलेल्या डब्यातील खाद्यजिन्नस खातात, असाही अनुभव आहे. सरकारने ह्या विषयात लक्ष घालून माध्यान्ह आहार योजनेतील खाद्यजिन्नस अधिक दर्जेदार कसे बनतील, ह्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

शाकाकाराबाबत मला धार्मिक रुढींपेक्षा आरोग्यासंदर्भातील मुद्दा अधिक महत्त्वाचा वाटतो. आपल्या भारतीय पर्यावरणात आरोग्याच्या दृष्टीने मांसाहारापेक्षा शाकाहार अधिक चांगला आहे, ह्याची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे. हे प्रत्येक मुलाच्याही मनांवर बिंबवले पाहिजे. त्यासाठी त्याची शास्त्रीय कारणे कोणती आहेत, हे मुलांना समजावून सांगितले पाहिजे. मुलांना विश्वासात घेऊन संतुलित आहाराचा विषय त्यांना प्रेमपूर्वक समजावून सांगितला पाहिजे.

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें