दिनांक : १.१२.२०२५
_*अभिनेता रणवीर सिंगकडून श्री चामुंडादेवीचा झालेला अवमान*_
*हिंदु जनजागृती समितीकडून कायदेशीर कारवाईची मागणी*
पणजी, १ डिसेंबर – गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (‘इफ्फी’च्या) समारोप सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांनी ‘कांतारा – चॅप्टर १’ या कन्नड चित्रपटातील देवीच्या अवताराची रंगमंचावर नक्कल केली आहे आणि चित्रपटात दाखवलेल्या पवित्र दैवत कोटीतुलू समाजातील चामुंडी दैव हिला ‘फिमेल घोस्ट’ (भूत) असे संबोधले आहे. या प्रकरणी अभिनेता रणवीर सिंग यांच्यावर चामुंडी दैव यांचा अपमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करणारी तक्रार वजा निवेदन हिंदु जनजागृती समितीने पणजी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना १ डिसेंबर या दिवशी दिले आहे. या वेळी पणजी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री. साहिन शेट्ये यांच्याकडे हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रमोद तुयेकर आणि दिलीप शेट्ये यांनी हे निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, चामुंडी दैव ही तुलू समाजाच्या आराध्य आणि कुलदैवत आहे. देवीला ‘भूत’ म्हणणे आणि तिच्या दैवी अवताराची करमणुकीच्या हेतूने नक्कल करणे ही अत्यंत अवमानकारक आणि हिंदू समाजाच्या श्रद्धास्थानावर आघात करणारी कृती आहे. या घटनेमुळे समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सार्वजनिक शांतता बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी रणवीर सिंग यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत धार्मिक भावना जाणूनबुजून दुखावणे व समाजात वैरभाव पसरविणे या गुन्ह्यांशी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून सखोल चौकशी करावी. ‘इफ्फी’चे आयोजक आणि संबंधित अधिकारी यांनीही भविष्यात अशा कार्यक्रमांत कोणत्याही धर्माच्या देव–देवतांचा अवमान होऊ नये, यासाठी स्पष्ट आचारसंहिता तयार करावी आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. हिंदु जनजागृती समितीने रणवीर सिंग यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागावी आणि पुढे अशा प्रकारचे वक्तव्य अथवा अभिनय न करण्याची हमी द्यावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्व हिंदू बांधवांना कायद्याचा मार्ग अवलंबून शांततामय, संयमी पण ठामपणे या अवमानाचा निषेध नोंदवण्याचे आवाहनही समितीने केले आहे.
आपला नम्र,
*डॉ. मनोज सोलंकी,*
राज्य समन्वयक, गोवा,
हिंदु जनजागृती समिती,
(संपर्क क्रमांक – ९३२६१०३२७८)






