राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय पर्यटन मंत्र्यांच्या परिषदेत गोव्याने सादर केला आपला दूरदर्शी पर्यटन आराखडा*

*राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय पर्यटन मंत्र्यांच्या परिषदेत गोव्याने सादर केला आपला दूरदर्शी पर्यटन आराखडा*

*गोवा, १५ ऑक्टोबर २०२५*— गोवा सरकारचे माननीय पर्यटन मंत्री श्री. रोहन ए. खंवटे यांनी राजस्थानमधील उदयपूर येथे १४ आणि १५ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या पर्यटन मंत्र्यांच्या परिषदेत गोव्याचे प्रतिनिधित्व केले. पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री श्री. गजेन्द्रसिंह शेखावत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परिषदेत सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील पर्यटन मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यांनी भारताच्या पर्यटन क्षेत्राच्या प्रगतीसाठी धोरण, नियोजन आणि संयुक्त प्रयत्नांवर चर्चा केली. पर्यटन मंत्र्यांसोबत पर्यटन संचालक श्री. केदार नाईक आणि पर्यटन मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्री. शॉन मेंडिस उपस्थित होते.

या परिषदेत “५० पर्यटन स्थळांच्या विकासाचा मसुदा आराखडा” आणि “परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह (पिएलआय)” तसेच इंटिग्रेटेड टुरिझम प्रमोशन स्कीम (आयटीपीएस) यावर चर्चा करण्यात आली. या योजनांद्वारे भारताला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात एकात्मिक आणि संपूर्ण पर्यटन गंतव्य म्हणून उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. तसेच केंद्र आणि राज्य स्तरावरील उपक्रमांना समन्वयित करून पर्यटन क्षेत्राची वाढ आणि भारताच्या जागतिक स्पर्धात्मकतेत भर घालणे हे उद्दिष्ट होते.

माननीय पर्यटन मंत्री श्री. रोहन ए. खंवटे म्हणाले, “गोव्याचे पर्यटन दृष्टिकोन हे पर्यावरणाचे संवर्धन, समुदायाचे कल्याण आणि आर्थिक वाढ यांचा समतोल साधणाऱ्या पुनरुत्पादक पद्धतींवर आधारित आहे. २०२५–२६ पर्यटन हंगामाची ही उत्तम सुरुवात आहे. गोवा आंतरराष्ट्रीय जोडणी वाढवत आहे आणि पर्यटन क्षेत्र विविधतेने विस्तारत आहे. पेडणे आणि काणकोण येथील आमचे नवीन प्रकल्प गोव्याच्या पर्यटनाचा चेहरामोहरा बदलतील. तंत्रज्ञानावर आधारित पर्यटन सुरक्षा आणि ‘अतिथी देवो भव’ या तत्त्वावर आधारित अनुभव देणे हे आमचे ध्येय आहे.”

गोव्याच्या सादरीकरणात मांद्रे (पेडणे) येथील “मेगा परफॉर्मन्स अरेना” आणि लोलये (काणकोण) येथील “भगवान परशुराम पुतळा व संग्रहालय” या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर विशेष भर देण्यात आला. हे दोन्ही प्रकल्प पर्यटक अनुभव समृद्ध करतील, रोजगार निर्माण करतील आणि गोव्याला जागतिक पर्यटन नकाशावर ठळकपणे स्थान देतील.

मेगा परफॉर्मन्स अरेना हा २०,००० आसनक्षमता असलेला अत्याधुनिक बहुउद्देशीय केंद्र असेल, जिथे आंतरराष्ट्रीय संगीत मैफिली, सांस्कृतिक कार्यक्रम, परिषद आणि मोठ्या मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करता येईल. हा प्रकल्प पेडणेच्या उत्तरेकडील पर्यटन विकासाला गती देईल.

भगवान परशुराम पुतळा व संग्रहालय, तसेच “लाइफस्केप प्रकल्प”, हे गोव्याच्या पुराणकथांवर आधारित सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्यटनाचे नवे केंद्र बनेल. या ठिकाणी कथाकथन क्षेत्र, दृश्य बिंदू आणि विशेष प्रदर्शने असतील, जे दक्षिण गोव्याच्या आंतरिक पर्यटन विकासासाठी महत्त्वाचे ठरतील.

पर्यटन संचालक श्री. केदार नाईक म्हणाले, “उदयपूर परिषदेमुळे गोव्याचा पर्यटन दृष्टीकोन राष्ट्रीय धोरणाशी जोडण्याची उत्तम संधी मिळाली. आम्ही गोव्याला वर्षभर आकर्षक अनुभव देणारे पर्यटन केंद्र बनवण्यावर भर देत आहोत, ज्यात पायाभूत सुविधा, वारसा संवर्धन आणि डिजिटल उपायांचा समावेश आहे. गोव्याचे पुनरुत्पादक पर्यटन हे सरकार, स्थानिक समुदाय आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील सहकार्यावर आधारित आहे, ज्यामुळे पर्यटनाचे फायदे थेट लोकांपर्यंत पोहोचतात. मेगा परफॉर्मन्स अरेना आणि भगवान परशुराम संग्रहालय हे दोन्ही प्रकल्प आर्थिक संधी निर्माण करतील आणि गोव्याला जागतिक पर्यटन नकाशावर अग्रणी ठरवतील.”

परिषदेदरम्यान गोव्याने आपल्या दीर्घकालीन, टिकाऊ आणि समुदाय-केंद्रित पर्यटन विकासाच्या दृष्टीकोनाचे सादरीकरण केले, ज्यात पायाभूत सुविधा, जोडणी, सांस्कृतिक जतन, तंत्रज्ञान आणि पर्यटक अनुभव या सर्व गोष्टींचा समावेश आहे.
२०२५–२६ च्या पर्यटन हंगामात गोव्याने पहिले चार्टर फ्लाइट आगमन नोंदवले आहे. नोवोसिबिर्स्क–मोपा दरम्यानच्या तीन साप्ताहीक फ्लाइट्स आणि अएरोफ्लॉटच्या मॉस्को, येकतेरिनबर्ग आणि नोवोसिबिर्स्क येथून होणाऱ्या नऊ साप्ताहीक फ्लाइट्समुळे रशियन बाजारपेठेत गोव्याची उपस्थिती अधिक मजबूत झाली आहे. तसेच कझाकस्तानहून सुरू होणाऱ्या चार्टर फ्लाइट्स (२५ ऑक्टोबर २०२५ पासून) नवीन बाजारपेठ उघडतील.

गोव्याच्या पर्यटन रूपांतरणाच्या सात स्तंभांवर म्हणजेच पर्यावरण आणि निसर्गाधारित पर्यटन, गोवन बॅकवॉटर्स, वारसा आणि संस्कृती एमआयसीई पर्यटन (मीटिंग्स, इव्हेंट्स, कॉन्फरन्सेस), एडवेन्चर पर्यटन, विश्रांती व मनोरंजन अध्यात्मिक, वेलनेस आणि वैद्यकीय पर्यटन ह्या वर भर देण्यात आला.

राज्याने तंत्रज्ञानावर आधारित पर्यटक सुरक्षा व सेवा सुधारणा यावर भर दिला असून, पर्यावरण आणि स्थानिक समुदायांचे रक्षण करत अखंड व सुरक्षित अनुभव देण्याची वचनबद्धता व्यक्त केली.

राष्ट्रीय पर्यटन मंत्र्यांच्या परिषदेद्वारे गोव्याने भारताच्या पर्यटन क्षेत्रातील आपली सक्रिय भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे. एक समृद्ध, शाश्वत आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मक पर्यटन प्रणाली निर्माण करण्यासाठी गोवा पर्यटन मंत्रालयासह सर्व राज्यांबरोबर घनिष्ठ सहकार्य करणार आहे.

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें