*दिनांक :* २४ नोव्हेंबर २०२६
*_‘रामायण’ चित्रपटाच्या संदर्भात सेन्सॉर बोर्डाला निवेदन सादर !_*
*सेन्सॉर बोर्ड केवळ हिंदूंच्या धर्मभावनांविषयी अत्यंत असंवेदनशील!* – श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था
*पुणे :* ‘रामायण’ चित्रपटात प्रभु श्रीरामांना राक्षसांपासून पळताना दाखवणे, शूर्पणखेचे नाक कापल्यावरून माता सीता लक्ष्मणाला खडसावत असल्याचे दाखवणे आणि अत्याचारी रावणाचे उदात्तीकरण करणे, असे अनेक प्रसंग धर्मग्रंथ आणि इतिहास यांची मोडतोड करून सादर केले आहेत. अशा अत्यंत आक्षेपार्ह प्रसंगांचा समावेश असतानाही केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) या चित्रपटाला प्रमाणपत्र कसे दिले? असा थेट सवाल करत ‘सेन्सॉर बोर्ड अन्य धर्मीयांच्या धर्मभावनांबद्दल अत्यंत जागरूक असून केवळ हिंदूंच्या धर्मभावनांविषयी अत्यंत असंवेदनशील आहे, असे परखड प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी केले. ते आज पुण्यात ‘रामायण’ चित्रपटाच्या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या चित्रपटातील आक्षेपार्ह भाग तातडीने वगळले पाहिजेत. तोवर हिंदू समाजाने हा चित्रपट पाहू नये, असेही आवाहन त्यांनी या वेळी केले. या पत्रकार परिषदेला, श्री संत तुकाराम महाराज संस्थान चिंतामणी प्रासादिक दिंडीचे ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव आणि हिंदु जनजागृती समितीच्या पुणे जिल्हा समन्वयक कु. क्रांती पेटकर यादेखील उपस्थित होत्या.
श्री. वर्तक पुढे म्हणाले की, सिनेमॅटोग्राफ अधिनियमाच्या कलम ५-ब आणि केंद्र शासनाच्या चित्रपट प्रमाणन मार्गदर्शक तत्त्वांनुसार धार्मिक समूहांचा अवमान करणारी दृश्ये आणि संवाद यांना प्रतिबंध आहे, असे असताना या चित्रपटातील आक्षेपार्ह प्रसंगांना प्रमाणनाच्या निकषांनुसार योग्य कसे ठरवण्यात आले? जेव्हा एखादा धार्मिक विषयावर चित्रपट येतो, तेव्हा तो योग्य संदर्भ आणि इतिहास यांना धरून आहे कि नाही, हे पडताळणे ही सेन्सॉर बोर्डाची जबाबदारी आहे. सेन्सॉर बोर्डातील अधिकारी मग नेमके काय पाहून प्रमाणपत्र देतात? या चित्रपटाबाबत तर अशी माहिती आहे की, एकही कट न सुचवता प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
सेन्सॉर बोर्डाच्या मुंबई कार्यालयात अधिकाऱ्यांची ताठर भूमिका आणि नंतरचे कारवाईचे आश्वासन : सेन्सॉर बोर्डाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकताना श्री. वर्तक यांनी २३ नोव्हेंबर रोजी मुंबई कार्यालयात घडलेला प्रकार उघड केला. सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम व श्री. सतीश सोनार यांच्या शिष्टमंडळाने मंडळाच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रीमती दीपा सुब्रमण्यम यांची भेट घेतली. प्रारंभी त्यांनी कोणतेही आक्षेप ऐकून घेण्यास नकार देत ‘आम्ही योग्य सेन्सॉर केले आहे’ अशी ताठर भूमिका घेतली; मात्र राक्षसांना पाहून प्रभु श्रीराम पळतानाचे आणि माता सीता लक्ष्मणाला खडसावतानाचे प्रसंग मूळ रामायणातच नसल्याचे पुराव्यानिशी निदर्शनास आणून देताच त्या निरुत्तर झाल्या. यावर ‘अन्य धर्मियांच्या चित्रपटांवर आक्षेप येताच तुम्ही तत्काळ कारवाई करता, मग हिंदूंच्या बाबतीतच दुजाभाव का?’ असा प्रश्न शिष्टमंडळाने त्यांना विचारला. त्यानंतर श्रीमती सुब्रमण्यम यांनी या आक्षेपांबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळवून योग्य ती कारवाई केली जाईल, तसेच येणाऱ्या ‘रामायण’ भाग-२ चे योग्य पद्धतीने पडताळणी करूनच सेन्सॉर केले जाईल, असे आश्वासन दिले.
प्रभु श्रीरामांच्या शौर्याचा अवमान व रावणाचे महिमामंडन का ? : ताडका आणि खर-दूषण यांच्या सेनेसमोर शस्त्रधारी प्रभु श्रीराम व लक्ष्मण पळ काढताना दाखवले आहेत; तर निशस्त्र रावण एकटाच हजारो सैनिकांशी निर्भयपणे लढताना व त्यांचा वध करतांना दाखवला आहे. अत्याचारी रावणाला गरिबांना सोन्याची घरे देणारा, शोषितांचा तारणहार व महिलांचा रक्षक म्हणून रंगवले आहे. तसेच प्रभु श्रीराम खर-दूषण राक्षसांची क्षमायाचना करत असल्याचे अनैतिहासिक प्रसंग घुसडण्यात आले आहेत.
माता सीतेच्या तोंडी काल्पनिक व संतापजनक संवाद ! : शूर्पणखेचे नाक कापल्यावरून माता सीता लक्ष्मणाला “कोणत्याही स्त्रीचे रूप विद्रूप करण्याचा तुला काहीही अधिकार नाही” असे खडसावत असल्याचे आणि प्रभु श्रीराम खर-दूषण राक्षसांची क्षमायाचना करत असल्याचे धादांत खोटे प्रसंग घुसडले आहेत. त्याग व निष्ठेचे प्रतीक असलेल्या लक्ष्मणाला उद्धट व गुरूजनांचा उपहास करणारे दाखवले आहे. असे अनेक आक्षेपार्ह प्रसंग व संवाद या चित्रपटात आहेत.
या विकृतीकरणाविरोधात आम्ही मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी आंदोलने केली. आता निर्माते श्री. नमित मल्होत्रा व दिग्दर्शक श्री. नितेश तिवारी यांच्याविरुद्ध मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आमची मागणी आहे की, निर्माते श्री. नमित मल्होत्रा व दिग्दर्शक श्री. नितेश तिवारी यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९९ व १९६ अन्वये गुन्हा नोंदवून कारवाई करावी. तसेच आक्षेपार्ह दृश्ये व संवाद वगळून सुधारित आवृत्तीचे पुनर्प्रमाणन करून चित्रपट पुनर्प्रदर्शित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी या वेळी केली.
श्री संत तुकाराम महाराज संस्थान, चिंतामणी प्रासादिक दिंडीचे ह. भ. प. दत्तात्रय चोरघे महाराज म्हणाले की, आम्ही वारकरी संप्रदायात कीर्तन-प्रवचन करतो त्या वेळी प्रभु श्रीरामचंद्रांचे गुणगान करतो. आम्ही कीर्तनात राम एकबाणी होता असे सांगतो. म्हणजे तो इतका पराक्रमी होता. त्याने मारलेला बाण कधी वाया जात नाही, भगवंताचा अवतार रावणवध करण्यासाठी झाला, तो रावणाच्या सैन्यातील काही राक्षसांना घाबरणार? इतके श्रीरामांचे अवमूल्यन आम्ही कधीही सहन करणार नाही.
‘सिनेमॅटिक लिबर्टी’च्या नावाखाली समाजाने काहीही खपवून घ्यावे का? धार्मिक गोष्टींमध्ये तर अशी ‘लिबर्टी’ घेऊन इतिहास बदलणे, अत्यंत अयोग्य आणि कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडवण्यासारखे आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि चित्रपट निर्मात्यांनी या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी. तसेच आताच आगामी ‘रामायण – भाग २’ असे काही होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तो चित्रपट धार्मिक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना दाखवून त्याला प्रमाणपत्र द्यावे. अन्यथा देशभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही श्री. अभय वर्तक यांनी या वेळी दिला.
आपला नम्र,
*श्री. अभय वर्तक*,
राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था,
(संपर्क : ९९८७९ २२२२२)






