गोवा मंत्रिमंडळाकडून गोवा एआय धोरण 2026 आणि पाच प्रमुख योजनांना मंजुरी

*गोवा मंत्रिमंडळाकडून गोवा एआय धोरण 2026 आणि पाच प्रमुख योजनांना मंजुरी*

*पर्वरी, 18 नोव्हेंबर 2026*: राज्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने गोवा मंत्रिमंडळाने आज गोवा एआय धोरण 2026 आणि माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण विभागाने (DITE&C) प्रस्तावित केलेल्या पाच प्रमुख योजनांना मंजुरी दिली. या धोरणांतर्गत निधीच्या वापरासाठी विशेष अर्थसंकल्पीय चौकट निश्चित करण्यात आली आहे. एकूण निधीपैकी 60 टक्के निधी कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य विकास आणि क्षमता वृद्धीसाठी, 20 टक्के निधी एआय स्टार्टअप्सना प्रोत्साहन व सहाय्य देण्यासाठी आणि उर्वरित 20 टक्के निधी राज्यातील एआय पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राखून ठेवण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एआय कौशल्य विकास उपक्रम सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. राज्याच्या तंत्रज्ञानविषयक विकासाच्या आराखड्यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या धोरणाचा दृष्टिकोन आणि राज्यावर होणाऱ्या परिवर्तनकारी परिणामांवर प्रकाश टाकताना माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण मंत्री माननीय श्री. रोहन खंवटे म्हणाले, “गोवा एआय धोरण 2026 आणि त्याअंतर्गत योजनांना मिळालेली मंजुरी ही गोवा एआय मिशन 2027 पुढे नेण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. एकूण निधीपैकी 60 टक्के निधी एआय कौशल्य विकास आणि तळागाळातील क्षमता वृद्धीसाठी राखून ठेवून आम्ही प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच युवा नवोन्मेषकांना एआय युगासाठी सज्ज करत आहोत. 2030 पर्यंत 50,000 पदवीधरांना एआय क्षेत्रासाठी तयार करण्याचे आमचे स्वप्न वेगाने प्रत्यक्षात येत आहे. हे सरकार केवळ आश्वासने देत नाही, तर ती प्रत्यक्षात उतरवते. या उद्दिष्टांची पूर्तता होताना पाहणे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण असेल. केवळ धोरण तयार न करता त्याची सक्रियपणे अंमलबजावणी करून प्रत्यक्ष योजना राबवणाऱ्या मोजक्या राज्यांपैकी गोवा एक आहे. नवोन्मेष निधीअंतर्गत एकूण 250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांसाठी 10 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील. त्यापैकी 60 टक्के निधी कौशल्य विकासासाठी, तर उर्वरित निधी पायाभूत सुविधा आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी वापरला जाईल.”

60 टक्के अर्थसंकल्पीय तरतुदीसह ‘एआय रेडी गोवा योजना – एआय कौशल्य विकास, प्रमाणपत्र आणि क्षमता वृद्धी कार्यक्रम’ राज्यात भविष्यासाठी सज्ज आणि सर्वसमावेशक एआय कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर भर देणार आहे. या योजनेंतर्गत शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने एआयच्या मूलभूत संकल्पनांची ओळख करून देणे, 50 सरकारी शाळांपर्यंत एआय प्रयोगशाळा स्थापन करणे, 500 शिक्षकांना प्रशिक्षण देणे आणि 100 तज्ज्ञांचे एआय प्रशिक्षकांचे जाळे उभारणे यांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे ‘कोंकणी एआय आणि संशोधन उत्कृष्टता योजना – एआय संशोधन, उत्कृष्टता केंद्रे आणि भाषा तंत्रज्ञान विकास’ या योजनेद्वारे कोंकणी भाषेसाठी लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) विकसित करून उपलब्ध करून देण्याचा तसेच भाषिणीच्या माध्यमातून भाषण आणि भाषांतरासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याचा उद्देश आहे. यासाठी स्थानिक समुदायाकडून पडताळणी करून आणि त्यांच्या संमतीने भाषिक माहितीचा संग्रह तयार केला जाणार आहे.

20 टक्के अर्थसंकल्पीय तरतुदीसह ‘उद्यम एआय योजना – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी एआय स्वीकार आणि अंमलबजावणी सहाय्य’ या योजनेद्वारे उद्यम एआय अंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी एकत्रित सहाय्य व्यवस्था विकसित केली जाणार आहे. यामध्ये गरजांचे मूल्यमापन, डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याच्या (DPDP) अनुपालनाच्या तयारीची तपासणी, सल्लागार सहाय्य, तंत्रज्ञान साधने आणि संगणकीय संसाधनांची उपलब्धता, अपेक्षित परिणामांशी जोडलेले एआय अंमलबजावणी सहाय्य आणि कौशल्य विकास यांचा समावेश असेल. या योजनेअंतर्गत दरवर्षी किमान 200 उद्योगांना मदत करण्याचे उद्दिष्ट आहे.

‘गोवा एआय स्टार्टअप आणि नवोन्मेष प्रोत्साहन योजना – स्टार्टअप निधी, इन्क्युबेशन आणि नवोन्मेष सहाय्य’ या योजनेद्वारे एआय स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, संशोधनाधारित उद्योग आणि तंत्रज्ञान कंपन्यांना इन्क्युबेशन, प्रारूप विकासासाठी सहाय्य, हॅकाथॉन, सरकारी आव्हानात्मक समस्या आणि क्षेत्रनिहाय उत्कृष्टता केंद्रांच्या माध्यमातून पाठबळ दिले जाणार आहे. तसेच सहकार्याने काम करण्यासाठी, प्रारूप विकसित करण्यासाठी आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी प्रमुख केंद्र म्हणून गोवा एआय लॅब विकसित केली जाणार आहे.

एआयशी संबंधित पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी आणि त्या कार्यान्वित करण्यासाठी 20 टक्के निधी मंजूर करण्यात आला आहे. ‘गोवा एआय पायाभूत सुविधा आणि संगणकीय संसाधन उपलब्धता योजना – एआय संगणकीय क्षमता, सँडबॉक्स, डेटा एक्स्चेंज आणि सामायिक एआय पायाभूत सुविधा कार्यक्रम’ या योजनेंतर्गत गोवा राज्याला एआय संगणकीय क्षमता उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी सी-डॅक (CDAC), इंडिया एआय कॉम्प्युट क्षमता, ऐरावत (AIRAWAT), मान्यताप्राप्त क्लाउड सेवा पुरवठादार किंवा मंजूर डेटा सेंटर भागीदारांच्या सहकार्याने सुमारे 100 जीपीयू किंवा त्याच्या समतुल्य जीपीयू-तासांची क्षमता उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. यापैकी 10 टक्क्यांपर्यंत क्षमता संवेदनशील आणि प्राधान्यक्रमावरील सार्वजनिक क्षेत्रातील वापरासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

गोवा एआय धोरण 2026 आणि या पाच योजनांच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण विभाग एआय क्षेत्रासाठी सज्ज मनुष्यबळ तयार करत आहे. नैतिक कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रादेशिक भाषा संगणन आणि देशभरातील एआय नवोन्मेषासाठी प्रयोगक्षेत्र म्हणून गोव्याला अग्रस्थानी नेण्याच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू आहे.

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें