NICCI गोवा कनेक्ट 2026 मध्ये सागरी उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान, कौशल्य, क्रीडा आणि पर्यटन क्षेत्रांत नॉर्वेसोबत धोरणात्मक भागीदारीचा गोव्याचा प्रयत्न

*NICCI गोवा कनेक्ट 2026 मध्ये सागरी उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान, कौशल्य, क्रीडा आणि पर्यटन क्षेत्रांत नॉर्वेसोबत धोरणात्मक भागीदारीचा गोव्याचा प्रयत्न*

*पणजी, नोव्हेंबर 2026*: आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि गोवा व नॉर्वे यांच्यातील द्विपक्षीय सहकार्याच्या संधींचा शोध घेण्यासाठी 19 नोव्हेंबर 2026 रोजी पणजी येथे NICCI कनेक्टच्या गोवा आवृत्तीचे आयोजन करण्यात आले. ठोस संधी ओळखणे, प्रमुख भागधारकांना एकत्र आणणे आणि चर्चेचे प्रत्यक्ष भागीदारीत रूपांतर करणे यावर या कार्यक्रमाचा भर होता. नॉर्वे इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (NICCI) च्या सदस्य कंपन्या, भारतीय आणि नॉर्वेजियन उद्योगसमूह, नॉर्वेहून आलेले व्यावसायिक शिष्टमंडळ, भारतातील टीम नॉर्वे आणि गोवा सरकारचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले.

या कार्यक्रमाला पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण तसेच मुद्रण व लेखनसामग्री मंत्री माननीय श्री. रोहन खंवटे उपस्थित होते. गोव्याच्या विकासाचा वेग आणि भारत-नॉर्वे सहकार्याच्या प्रचंड क्षमतेवर प्रकाश टाकताना ते म्हणाले, “यावर्षी मे महिन्यात आपले माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे माननीय पंतप्रधान श्री. जोनास गार स्टोरे यांनी ओस्लो येथे भेट घेऊन भारत-नॉर्वे संबंधांना हरित धोरणात्मक भागीदारीच्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला. जहाजबांधणी, नील अर्थव्यवस्था, हरित ऊर्जा आणि स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी नॉर्वेजियन कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले. अनुकूल धोरणांमुळे आज गोव्यात डीपीआयआयटीकडे नोंदणीकृत सुमारे 830 स्टार्टअप्स आहेत. त्यापैकी 40 टक्क्यांहून अधिक स्टार्टअप्सचे नेतृत्व महिला करत आहेत आणि अनेक स्टार्टअप्स युनिकॉर्न बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सागरी प्रकल्पासाठी अभियांत्रिकी भागीदार हवा असो किंवा सॉफ्टवेअर क्षेत्रातील चमू, मी तुम्हाला गोव्यात येऊन आपला व्यवसाय उभारण्याचे आवाहन करतो. भारत आणि नॉर्वे यांच्यात आधीपासूनच मजबूत व्यावसायिक संबंध आहेत आणि ही केवळ सुरुवात आहे. उच्च साक्षरता आणि देशाच्या इतर भागांशी असलेल्या दृढ सांस्कृतिक संबंधांमुळे गोव्यात सुरू झालेल्या कोणत्याही उपक्रमाला संपूर्ण भारतात यश मिळू शकते.”

नॉर्वे इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (NICCI) ही संस्था दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंध, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सीमापार भागीदारीला चालना देण्यासाठी कार्यरत आहे. गोव्याच्या आर्थिक आकर्षकतेविषयी आपले मत मांडताना NICCI चे अध्यक्ष श्री. हेल्गे ट्रायटी म्हणाले, “मी भारताला भेट देण्यापूर्वीपासूनच गोव्याला येण्याची इच्छा होती. मी आतापर्यंत सुमारे दहा वेळा गोव्याला भेट दिली आहे. पहिली भेट 2013 मध्ये होती आणि आज आम्ही येथे व्यावसायिक उद्देशाने आलो आहोत. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत गोवा देशातील सर्वात समृद्ध राज्य आहे. गोव्यातील तीन गोष्टी विशेषत्वाने लक्ष वेधून घेतात. पहिली म्हणजे येथील साधेपणा. गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळ एकल खिडकी प्रणाली म्हणून कार्य करते. दुसरी म्हणजे येथील लोक. राज्याचा साक्षरता दर उच्च असून अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील शिक्षणसंस्था येथे आहेत. तिसरी म्हणजे विकासासाठी उपलब्ध असलेल्या संधी. औद्योगिक वसाहती, महानगरांच्या तुलनेत कमी खर्च आणि स्टार्टअप धोरणाचे पाठबळ यामुळे गोव्यात वाढीसाठी मोठी संधी आहे.”

या कार्यक्रमात प्रमुख भाषणे, परिसंवाद, स्टार्टअप सादरीकरण सत्र आणि विविध क्षेत्रांनुसार नियोजित व्यावसायिक जुळवणी सत्रांचा समावेश होता. नॉर्वे-भारत व्यावसायिक सहकार्याचे भविष्य, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील क्षमता विकसित करणे आणि नॉर्वेतील ग्योविक प्रदेश व भारत यांच्यात व्यवसाय, कौशल्य आणि शैक्षणिक क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्याच्या संधी शोधणे या विषयांवर चर्चा झाली. गोव्याची संस्कृती, पर्यावरण आणि जीवनशैली यांमुळे डिजिटल नोमॅड्स, सर्जनशील क्षेत्रातील डिझायनर्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याचे वक्त्यांनी अधोरेखित केले. तसेच गोव्याची विस्तीर्ण किनारपट्टी आणि स्पष्ट धोरणात्मक दिशा यांमुळे सागरी उद्योग आणि जहाजबांधणी क्षेत्रातील भागीदारीसाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या दिवसातील महत्त्वाचे आकर्षण म्हणजे स्टार्टअप सादरीकरण सत्र. यामध्ये निवडक कंपन्यांनी तीन मिनिटांत विशिष्ट व्यावसायिक संधी आणि धोरणात्मक अपेक्षा तज्ज्ञांच्या समितीसमोर मांडल्या. या समितीने त्यांना पुढील कार्यवाही आणि बाजारपेठेशी संपर्क साधण्याबाबत उपयुक्त सूचना दिल्या. याशिवाय शिक्षणसंस्था आणि उद्योग, सागरी उद्योग, क्रीडा, आरोग्य आणि पर्यटन तसेच नॉर्वेजियन तंत्रज्ञान आणि भारतीय कौशल्य या क्षेत्रांमध्ये स्वतंत्र व्यावसायिक जुळवणीसाठी गोलमेज चर्चांचे आयोजन करण्यात आले. गोवा आणि नॉर्वे यांच्यातील परस्पर हितसंबंधांचे प्रत्यक्ष, दीर्घकालीन व्यावसायिक आणि संस्थात्मक सहकार्यामध्ये रूपांतर करण्यास या चर्चांमुळे मदत होणार आहे.

NICCI कनेक्ट आणि नॉर्वेजियन शिष्टमंडळाची गोव्याला ही दुसरी भेट असून, राज्यासोबत प्रादेशिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दोन्ही बाजूंच्या सामायिक बांधिलकीचे हे प्रतीक आहे. गोव्याची व्यावसायिक परिसंस्था आणि सहकार्याच्या संधी अधिक सखोलपणे समजून घेण्यासाठी हे शिष्टमंडळ उद्याही विविध ठिकाणांना भेट देणार आहे.

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें