दिनांक : १७.११.२०२६
*तुळशी विवाह*
*तुलसि श्रीसखि शुभे पापहारिणि पुण्यदे ।*
*नमस्ते नारदनुते नारायणमनःप्रिये ॥ – तुलसीस्तोत्र, श्लोक १५*
*अर्थ :* हे तुलसी, तू लक्ष्मीची मैत्रीण, शुभदा, पापहारिणी आणि पुण्यदा आहेस. नारदाने स्तवलेल्या आणि नारायणाला प्रिय अशा तुला मी वंदन करतो.
*प्रस्तावना :* – हिंदु धर्मात तुळशीला देवी स्वरूपात पूजतात. आपण इतरवेळी तुळशिमाता म्हणून तिची पूजा करीत असलो तरीही कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत या कालावधीत तिला कन्या रुपात पूजन करून भगवान विष्णूच्या शाळीग्राम रूपाशी किंवा श्रीविष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीशी विवाह करतात, पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती. हा विवाह विधी पूजोत्सव म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. (विष्णू पुराण, पद्म पुराणासह अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये तुळशी विवाहाचा उल्लेख आहे. )
*दरवर्षी तुळशीविवाह का?* –
१. तुळसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानतात. तुळसी विवाह व्रत हे एक काम्य व्रत आहे.
२. यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात आणि वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतात. उत्तम संततीप्राप्त होते.
३. प्रत्येक विवाहित स्त्रीने तुळशी विवाह नक्की केला पाहिजे असे मानले जाते. असे केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते.
४. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा या हेतूने तुळशी विवाह करतात. (जोशी, महादेवशास्त्री (२००१). भारतीय संस्कृती कोश खंड ५. पुणे: भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन.)
५.तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांचे उद्यापन करतात.
६. विवाह संस्काराचे महत्व भावी पिढीला कळावे. यासाठी हा पूजोत्सव प्रत्येकाने आपल्या घरी अवश्य करावा.
*तुळशीचे महत्व*
हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीचे केवळ आध्यात्मिक महत्व नसून आयुर्वेदात सुद्धा तिचे तितकेच महत्व आहे.
१. तुळस बहुगुणी आणि प्रभावी औषध आहे. त्यामुळे शास्त्राने देवपूजा व श्राद्ध यामध्ये तुळस आवश्यक सांगितली आहे.
२. एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणे, हे धार्मिकतेचे व सदाचाराचे प्रतीक मानले जाते.
३. श्रीविष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पान वाहिल्याने तो जितका प्रसन्न होतो, तितका अन्य कशानेही प्रसन्न होत नाही.
४. तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभते.
५. तुळशीपूजेशिवाय नित्य पूजा पूर्ण होत नाही.
६. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य वैकुंठात जातो, अशी श्रद्धा आहे.
७. तुळशी दुषित वायू शोषून घेते आणि प्राणवायू सोडते, त्यामुळे वातावर शुद्ध होण्यास साहाय्य होते. हे विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे. म्हणून दारोदारी तुळशी वृंदावन बांधले जाते. तसेच शहरी भागात खिडकीतल्या कुंडीत, दाराजवळ तुळशीचे रोप लावले जाते. दारात तुळशी असणे, हे शुभ मानतात.
*तुळशी विवाह संध्याकाळी का करतात?*
ही वेळ गोधूळीची ( गाई चरुन घरी येण्याची वेळ ) म्हणजे सायंकाळची असते. प्रबोधिनी एकादशीला श्रीविष्णू योग निद्रेतून जागे होतात आणि सृष्टी संचलानाचे कार्य पुन्हा सुरू करतात असे मानतात. तुळशी विवाहाच्या कालावधीत वातावरणात विष्णू तत्व आणि लक्ष्मी तत्व खूप जास्त प्रमाणात कार्यरत असते. त्याचा एकत्रित लाभ जीवाला व्हावा यासाठी संध्याकाळी तुळशी विवाह करतात.
*तुळशी विवाहाचा आध्यात्मिक लाभ होण्यासाठी पुढील कृती करा :*
१. विष्णू आणि लक्ष्मी तत्वाचा लाभ होण्यासाठी विवाहाची पूर्वतयारी करतांना प्रत्यक्ष लक्ष्मी माता आणि श्री विष्णूचा विवाह आहे असा भाव ठेवावा.
२. श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी यांना शरण जाऊन ‘तुम्हाला अपेक्षित असलेली विवाहाची पूर्वतयारी करून घ्यावी ‘ अशी प्रार्थना करावी.
३. तुळशी विवाह असला तरीही लगीनघाई असतेच. त्यात बरेचदा मनावर कामाचा ताण येतो, चिडचिड होते, असे होऊ नये आणि तुळशी विवाह भावपूर्ण व्हावा यासाठी स्वतःच्या मनाचे सतत निरीक्षण करावे. मनाला आनंदी आणि सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करावा.
४. सगळ्या कामाचे पूर्व नियोजन करावे. विवाहाच्या कामात घरच्या सगळ्यांना यथाशक्ती सहभागी करून घ्यावे.
५. हा पूजोत्सव भावपूर्ण संपन्न झाला म्हणून श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी.
*संकलक – श्री. तुळशीदास गांजेकर, सनातन संस्था,*
(संपर्क क्रमांक : ९३७०९ ५८१३२)






