पीपल्स विद्यालयाच्या शिक्षकांसाठी माइंड मॅपिंग कार्यशाळेचे आयोजन
पणजी : शिक्षकांना अध्यापन करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि प्रभावी अध्यापनाच्या विविध पद्धती जाणून घेण्यासाठी मळा -पणजी येथील पीपल्स विद्यालयात ‘अध्यापन करताना शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि माइंड मॅपिंगच्या माध्यमातून त्यावरील उपाय’ या विषयावर पीपल्सच्या विविध विभागांच्या शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
प्रसिद्ध माइंड मॅप प्रशिक्षक झहीर मिर्झा यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. तन्वी गोखले, रिद्धी पाटील आणि उत्सव चक्रवर्ती यांनी कार्यशाळेच्या आयोजनात सहकार्य केले.
या कार्यशाळेत अध्यापनाचे प्रभावी साधन म्हणून माइंड मॅपिंगचा वापर कसा करता येतो, यावर भर देण्यात आला. गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगणे, विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील विचारांना चालना देणे तसेच वर्गातील अध्ययन अधिक रंजक, परिणामकारक आणि अर्थपूर्ण बनविणे यांसाठी माइंड मॅपिंगचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उपस्थित शिक्षकांनी तसेच शाळा प्रमुखांनीही त्यात सक्रीय सहभाग नोंदवला.
पीपल्स एज्युकेशनल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त राहूल देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर शिक्षिका एन्जी रॉड्रिग्ज यांनी आभार मानले.






