देवस्थानासाठी स्वतःला झोकून देणारे समर्पित व्यक्तिमत्त्व श्री. संदीप अंकुश फडते काळाचा पडद्याआड……

देवस्थानासाठी स्वतःला झोकून देणारे समर्पित व्यक्तिमत्त्व श्री. संदीप अंकुश फडते काळाचा पडद्याआड……

रेवोडा गावचे सुपुत्र, गोवा पोलीस खात्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले आणि श्री वेताळ माऊली  पंचायातनचे माजी अध्यक्ष श्री. संदीप अंकुश फडते यांचे दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची सकाळीच आलेली दुःखद बातमी ऐकून गावकऱ्यांसह देवस्थानचे महाजन, हितचिंतक आणि मित्रपरिवार यांचे मन सुन्न झाले.

स्पष्टवक्तेपणा, निर्भीड विचार, प्रामाणिकपणा आणि देवस्थानासाठी स्वतःला झोकून देण्याची वृत्ती ही श्री. संदीप फडते यांच्या व्यक्तिमत्त्वाची विशेष ओळख होती. देवस्थान हेच त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग होते. सतत देवस्थानच्या विकासाचा विचार करणारे, देवस्थानच्या भवितव्याबद्दल चर्चा करणारे आणि त्यासाठी नवनवीन कल्पना मांडणारे असे हे समर्पित व्यक्तिमत्त्व आज अचानक आपल्यातून निघून गेले, ही बाब मनाला चटका लावणारी आहे.

श्री. संदीप फडते यांनी श्री वेताळ माऊली देवस्थानच्या अध्यक्षपदाची तब्बल १२ वर्षे जबाबदारी सांभाळली. या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेतले. देवस्थान परिसरातील विविध विकासकामे, सोयी-सुविधा आणि परिसराच्या विकासासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार आज त्यांच्या कार्याची साक्ष देत आहे.

त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक सोहळे विशेष उल्लेखनीय ठरले. श्री वेताळ माऊली पंचायातनच्या पुनर्प्रतिष्ठापनेचा २५ वा रौप्यमहोत्सवा निम्मित पालखीउत्सव तसेच कळसोत्सवाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा त्यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. या सर्व कार्यक्रमांमध्ये त्यांचे नेतृत्व, नियोजन, मार्गदर्शन आणि सर्वाना सोबत घेऊन जाण्याची पद्धत विशेषत्वाने जाणवत होती.

देवस्थानच्या प्रत्येक कार्यात ते अग्रभागी असायचे. धार्मिक कार्यक्रम असो, देवस्थानचा विकास असो किंवा गावाच्या हिताचा विषय असो—त्यांचा सक्रिय सहभाग आणि मार्गदर्शन नेहमीच मिळत असे. देवस्थानच्या कामाबाबत त्यांच्याशी चर्चा केली की त्यांच्या मनात देवस्थानच्या विकासासंबंधी अनेक विचार आणि योजना असल्याचे जाणवत असे. देवस्थानच्या प्रगतीसाठी काहीतरी नवीन करण्याची त्यांची धडपड कायम सुरू असायची.

वडिलांचा आदर्श घेऊन पोलीस सेवेत प्रवेश

श्री. संदीप फडते यांनी आपल्या वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पोलीस सेवेत प्रवेश केला. सन १९९० मध्ये वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी ते गोवा पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांचे वडील स्वर्गीय श्री. अंकुश फडते हेदेखील पोलीस सेवेत होते. वडिलांच्या सेवाभावी आणि शिस्तप्रिय जीवनाचा आदर्श घेऊन संदीप यांनी पोलीस खात्यात आपली सेवा बजावली.

पोलीस सेवेत कर्तव्य बजावत असतानाच गाव आणि देवस्थानाशी असलेले त्यांचे नाते त्यांनी कधीही कमी होऊ दिले नाही. उलट, आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांसोबत देवस्थान आणि समाजासाठी वेळ देत त्यांनी एक आदर्श निर्माण केला.

त्यांचे मार्गदर्शन हीच आमची मोठी शिदोरी

अध्यक्ष म्हणून तब्बल १२ वर्षे त्यांनी देवस्थानची धुरा सांभाळली. या काळात देवस्थानच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय, केलेले प्रयत्न आणि दिलेले मार्गदर्शन हे देवस्थानसाठी निश्चितच मोलाचे ठरले आहे.

त्यांचा स्पष्टवक्तेपणा कधी कधी परखड वाटला तरी त्यामागे देवस्थानच्या हिताचीच भावना असायची. देवस्थानच्या कार्यात कोणतीही तडजोड न करता योग्य ते काम व्हावे, देवस्थानचा विकास व्हावा आणि पुढील पिढीलाही आपली धार्मिक व सांस्कृतिक परंपरा अभिमानाने पुढे नेता यावी, हीच त्यांची भूमिका होती.

आज ते आपल्यात नाहीत. परंतु देवस्थानच्या परिसरात त्यांनी केलेली विकासकामे, त्यांनी घडवून आणलेले सोहळे आणि त्यांनी दिलेले मार्गदर्शन त्यांच्या स्मृती कायम जिवंत ठेवतील.

देवस्थानाचा विचार त्यांच्या मनात सतत असायचा आणि देवस्थानच्या कार्यात ते मनापासून लीन झालेले असायचे. त्यामुळेच त्यांचे निधन हे केवळ एका व्यक्तीचे निधन नसून, देवस्थानच्या कार्याला सदैव पुढे नेण्यासाठी झटणाऱ्या एका समर्पित कार्यकर्त्याची मोठी हानी आहे.

सकाळी त्यांच्या निधनाची बातमी ऐकताना “संदीप आता आपल्यात नाहीत” ही वस्तुस्थिती स्वीकारणेच अनेकांसाठी कठीण झाले. कालपर्यंत देवस्थानच्या विकासाबद्दल बोलणारा, मार्गदर्शन करणारा आणि प्रत्येक कामात पुढाकार घेणारा आपला सहकारी आज अचानक आपल्यातून निघून गेला आहे.

त्यांचे मार्गदर्शन, त्यांची कार्यतत्परता, स्पष्टवक्तेपणा आणि देवस्थानाविषयीची तळमळ यांची उणीव कायम जाणवत राहील.

श्री वेताळ माऊलीच्या चरणी लीन झालेल्या या समर्पित सेवकास आज बाराव्या दिवशी भावपूर्ण श्रद्धांजली!

ईश्वरचरणी प्रार्थना आहे की, दिवंगत श्री. संदीप अंकुश फडते यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.

एक परिचित

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें