दिनांक : १.१०.२०२६
_*वेर्णा येथे १६ वर्षांच्या हिंदु मुलीवर धर्मांतर करण्यासाठी बळजोरी केल्याचे प्रकरण*_
*गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा करून धर्मांतराला आळा घाला ! – हिंदु राष्ट्र समन्वय समितीची षसरकारकडे मागणी*
पणजी, १ ऑक्टोबर – वेर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ वर्षांच्या हिंदु मुलीवर धर्मांतर करण्यासाठी बळजोरी केल्याचे प्रकरण नोंद झालेले आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा करून धर्मांतराच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. यासंबंधीचे निवेदन उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकीत यादव (आय.ए.एस.) यांना देण्यात आले आहे. हे निवेदन देतांना गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव सर्वश्री जयेश थळी, ‘हिंदू रक्षा महाआघाडी’चे रामदास सावईवेरेकर, ‘हिंदु युवा शक्ती, गोवा’चे विनोद वारखंडकर, विश्व हिंदु परिषदेचे श्री. संजू कोरगावकर, वास्को येथील हिंदुत्वनिष्ठ परशुराम गणाचारी आणि हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे सत्यविजय नाईक यांची उपस्थिती होती.
वेर्णा येथील प्रकणातील पीडितेने पोलिसांना साक्ष देतांना तिच्यावर गरोदर असताना इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचे म्हटले आहे. आरोपीने दबाव आणून पीडितेचे हिंदु धर्मानुसार आचरण बंद केले. तिला ‘बिंदी’, ‘कुंकू’ लावण्यास मनाई केली. हिंदु देवतांची छायाचित्रे घरी आणल्याने आरोपीने पीडितेशी भांडण केले. ‘लक्ष्मीदेवी’चे छायाचित्र आरोपीने जाळले. पीडितेच्या नावाचे बनावट आधारकार्ड बनवले. या सर्व बाबी पीडितेने पोलिसांना सांगितल्या आहेत. दैव बलवत्तर म्हणून तिची या प्रकरणातून सुटका झाली. गोवा सरकार गत महिन्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनात बळजोरीने, आमीष दाखवून, फसवणूक करून किंवा विवाहाच्या माध्यमातून होणार्या अवैध धर्मांतराला आळा घालण्यासाठी ‘गोवा कायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक विधेयक २०२६’ आणू पहात होते; मात्र याला काही घटकांनी विरोध केल्याने सरकारचा हा प्रयत्न बारगळला. वेर्णा येथील प्रकरण ‘लव्ह जिहाद’चे असून यामुळे गोव्यात धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरिखित झाली आहे. गोवा सरकारने देशातील इतर १२ राज्यांप्रमाणे तत्परतेने गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा आणावा.
आपला नम्र,
*श्री. सत्यविजय नाईक*
हिंदु राष्ट्र समन्वय समिती, (संपर्क क्रमांक – ९१५८९ ५४४५५)






