*रंगभूमीचा ध्यास जपणारे आनंद मुकुंद परब यांचा गौरव*
वारखंड–पेडणे येथील गुणी नाट्यकलाकार आनंद मुकुंद परब यांच्या उल्लेखनीय नाट्यप्रवासाची दखल घेत सिद्धेश्वर हरमल संस्थेतर्फे त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मांद्रे येथील जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित समारंभात गोमंतकीय ज्येष्ठ नाट्यकर्मी रवींद्र आमोणकर यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. यावेळी संगीततज्ज्ञ नाना आसोलकर, ज्येष्ठ रंगकर्मी काका प्रभुदेसाई तसेच संस्थेचे अध्यक्ष संजय मयेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

बी.कॉम., एलएलबी, एलएलएम आणि एमबीए अशी उच्च शैक्षणिक पात्रता असलेले आनंद परब हे सरकारी सेवेत कार्यरत असून, बालपणापासून जोपासलेली रंगभूमीची आवड आजही तेवढ्याच निष्ठेने जपत आहेत. आईच्या साड्यांचे पडदे बांधून मित्रांसोबत वाड्यात नाटके सादर करण्यापासून सुरू झालेला त्यांचा अभिनयप्रवास २००३ मध्ये रुक्मिणी हरण या नाटकातून व्यावसायिक रंगमंचावर पोहोचला. त्यानंतर शंभूराजे, रायगड, आकाशमोठी, सिंहाचा शावा, पन्हाळगडावरून, ही श्रीची इच्छा, देव्हाऱ्यातील देव दुजा आदी गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी संभाजी महाराज, मुरारबाजी देशपांडे, औरंगजेब, सिद्दी जोहर, द्रोणाचार्य, ब्रह्मदेव, हिरोजी, उमेश, शेखर आणि शरद यांसारख्या वैविध्यपूर्ण भूमिका प्रभावीपणे साकारल्या.
कला अकादमी गोवा आयोजित अ, ब व कोकणी नाट्यस्पर्धांमध्ये त्यांच्या नाटकांना अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत. रणांगण या ऐतिहासिक नाटकाला प्रथम क्रमांक, ही श्रीची इच्छा ला तृतीय क्रमांक, तर अंधायुग ला अ व कोकणी गटात तृतीय क्रमांकाचे यश मिळाले. राघोबादादा या भूमिकेसाठी त्यांना वैयक्तिक अभिनय प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे.
“रंगभूमी साथ देईल तोपर्यंत अभिनय करत राहणार,” अशी भावना व्यक्त करत आनंद परब यांनी आपल्या गुरूजन, दिग्दर्शक आणि सहकलाकारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पेडणे तालुक्याच्या समृद्ध नाट्यपरंपरेत त्यांच्या योगदानाचा हा सन्मान विशेष मानला जात आहे.






