रक्षाबंधन*

_

दिनांक : २५.०८.२०२६

*रक्षाबंधन*
*रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमा या तिथीला साजरा केला जातो. या वर्षी ही तिथी २८ ऑगस्ट २०२६ या दिवशी आहे. बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देऊन तिला आशीर्वाद देतो. राखी बांधण्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा अन् भावाने बहिणीचे संरक्षण करावे, ही भूमिका असते. रक्षाबंधन या सणाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेम व्यक्त केले जाते, त्याचप्रमाणे त्यांच्यातील देवाण-घेवाणही न्यून होत असतो. त्यामुळे हा सण भाऊ आणि बहीण या दोघांना ईश्वराकडे घेऊन जाणारा ठरतो. रक्षाबंधनामागील इतिहास आणि शास्त्र यांविषयी माहिती जाणून घेऊया.*

*रक्षाबंधन कधी करावे ?*
‘रक्षाबंधन भद्रारहित अशा श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अपराहृकाली किंवा प्रदोषकाली (सूर्यास्तानंतर साधारण अडीच घंटे) करावे’, असे ‘धर्मसिंधु’ नामक ग्रंथात आढळते.

*रक्षाबंधन कधी करू नये ?*
श्रावण पौर्णिमेच्या दिवशी विष्टी करण (भद्रा) चालू असतांना रक्षाबंधन केल्यास हे नाशाला कारणीभूत होते, असे निर्णयसिंधू ग्रंथात आढळते. त्यामुळे या काळात राखी बांधणे सर्वथा निषिद्ध आहे.

*रक्षाबंधन : इतिहास*
१. पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले आणि नारायणाची मुक्तता केली. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता.

२. ‘बारा वर्षे इंद्र आणि दैत्य यांच्यात युद्ध चालले. आपली १२ वर्षे म्हणजे त्यांचे १२ दिवस. इंद्र थकून गेला होता आणि दैत्य वरचढ होत होते. इंद्र त्या युद्धातून स्वतःचे प्राण वाचवून पळून जाण्याच्या सिद्धतेत होता. इंद्राची ही व्यथा ऐकून इंद्राणी गुरूंना शरण गेली. गुरु बृहस्पति ध्यान लावून इंद्राणीला म्हणाले, ‘‘जर तू आपल्या पातिव्रत्य बळाचा उपयोग करून हा संकल्प केलास की, माझे पतीदेव सुरक्षित रहावेत आणि इंद्राच्या उजव्या मनगटावर एक धागा बांधलास, तर इंद्र युद्ध जिंकेल.’’ इंद्र विजयी झाला आणि इंद्राणीचा संकल्प साकार झाला.

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः ।
तेन त्वाम् अभिबध्नामि रक्षे मा चल मा चल ।।

अर्थ : ‘जे बारीक रक्षासूत्र महाशक्तीशाली असुरराज बळीला बांधले होते, तेच मी तुम्हाला बांधत आहे. तुमचे रक्षण होवो. हा धागा तुटू नये आणि तुमचे सदैव रक्षण होवो.’

३. भविष्यपुराणात सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन हे मूळचे राजांसाठी होते. राखीची एक नवी पद्धत इतिहासकाळापासून चालू झाली.

४. प्राचीन काळातील राखी
तांदूळ, सोने आणि पांढर्‍या मोहर्‍या पुरचुंडीत एकत्र बांधल्याने रक्षा अर्थात राखी सिद्ध होते. ती रेशमी दोर्‍याने बांधली जाते.

*राखी बांधण्यामागील शास्त्र*
बहीण आणि भाऊ यांच्यातील देवाण-घेवाण हिशोब संपण्यास साहाय्य होणे

*भावनिक दृष्टीकोण : भाऊ-बहिणीच्या निर्मळ प्रेमापुढे काम आणि क्रोध निष्प्रभ होणे*

‘रक्षाबंधन हे विकारांमध्ये पडणार्‍या तरुण-तरुणींसाठी एक व्रत आहे. बहिणीने भावाला राखी बांधण्याहून जास्त महत्त्वाचे आहे, एखाद्या तरुणाने / पुरुषाने एखाद्या तरुणीकडून / स्त्रीकडून राखी बांधून घेणे. त्यामुळे तरुणांचा आणि पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन पालटतो. भाऊ-बहिणीच्या निर्मळ प्रेमापुढे काम शांत होतो. क्रोधाचेही शमन होते आणि समतायुक्त विचारांचा उदय होऊ लागतो. रक्षाबंधन हे पर्व समाजातील तुटलेल्या मनांना जोडण्याची एक सुसंधी आहे. याच्या आगमनाने कुटुंबातील आपापसातील कलह शांत होऊ लागतात. दुरावा दूर होऊ लागतो आणि सामूहिक संकल्पशक्ती साकार होऊ लागते.

*रक्षाबंधन असा साजरा करा !*
*हे करा !*
१. भावाने बहिणीच्या घरी जावे.
२. बहिणीने भावाचे औक्षण करून त्याला राखी बांधावी.
३. बहिणीने भावाला नमस्कार करावा.
४. भावाने बहिणीला सात्त्विक ओवाळणी द्यावी.
५. प्रार्थना करावी.

*हे करू नये !*
१. भावाला देवतांची चित्रे असलेल्या राख्या बांधू नका.
२. बहिणीने राखी बांधतांना भावाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नये.
३. भद्राकाळात राखी बांधून घेऊ नये.

*संकलक : श्री. तुळशीदास गांजेकर, सनातन संस्था, (संपर्क क्र.-९३७०९ ५८१३२)*

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें