गोव्यात रोटरॅक्ट चळवळीच्या विस्ताराला वेग; सप्टेंबरपर्यंत १०० क्लबचे उद्दिष्ट

गोव्यात रोटरॅक्ट चळवळीच्या विस्ताराला वेग; सप्टेंबरपर्यंत १०० क्लबचे उद्दिष्ट

– ताळगाव येथे रोटरी रोटरॅक्ट एन्क्लेव्ह; ३२ नव्या रोटरॅक्ट क्लबना मान्यता, देशभरात १,००० क्लबचे लक्ष्य

पणजी : गोव्यात रोटरॅक्ट चळवळीचा विस्तार करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी ताळगाव येथे रोटरी रोटरॅक्ट एन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ३२ नव्या रोटरॅक्ट क्लबना मान्यता देण्यात आली. यंदा आरआय डिस्ट्रिक्ट ३१७०ने १० लाख लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले असून, सप्टेंबरपर्यंत १०० रोटरॅक्ट क्लब स्थापन करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. वर्षअखेरीस ही संख्या आणखी वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच यंदा ३०० हून अधिक इंटरॅक्ट क्लब स्थापन करण्याचे नियोजन आहे.

या कार्यक्रमाला रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष यिंका बाबालोला, रोटरी इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष एम. मुरुगानंदम, रोटरी इंटरनॅशनलचे संचालक फ्लाइट लेफ्टनंट के. पी. नागेश, आरआय डिस्ट्रिक्ट ३१७०चे गव्हर्नर रोटेरियन डॉ. लेनी दा कोस्टा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

डॉ. लेनी दा कोस्टा यांनी सांगितले की, यंदा आरआय डिस्ट्रिक्ट ३१७०ने १० लाख लोकांच्या जीवनाला स्पर्श करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या उद्दिष्टाच्या दिशेने ३२ नवीन रोटरॅक्ट क्लबना शुक्रवारी चार्टर प्रदान करण्यात आले. सप्टेंबरपर्यंत १०० रोटरॅक्ट क्लब स्थापन करण्याचे आणि वर्षअखेरीस त्यापेक्षाही अधिक क्लब उभारण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर ३०० हून अधिक इंटरॅक्ट क्लब स्थापन करण्यात येणार आहेत.

“हे आम्ही पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. काही जण याला महत्त्वाकांक्षी म्हणतील; मात्र माझ्यासाठी हे आवश्यक आहे. रोटरी म्हणजे कृती करणे आणि खऱ्या अर्थाने बदल घडवून आणणे. कुठेतरी एखादे मूल उपाशी झोपते, एखादा रुग्ण डायलिसिसच्या प्रतीक्षेत असतो, एखाद्या वृद्ध व्यक्तीला सहवासाची गरज असते, तर एखादे कुटुंब उद्याचा दिवस चांगला असेल का, या चिंतेत असते. रोटरी या आशांना प्रतिसाद देऊ शकत नसेल तर कोण देणार?” असा सवाल त्यांनी केला.

“प्रत्येक रक्तदाता, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक स्वयंसेवक, फाउंडेशनला योगदान देणारा प्रत्येक व्यक्ती, रोटरीमध्ये सहभागी होणारा प्रत्येक सदस्य आणि आपण एकत्र निर्माण केलेले प्रत्येक हास्य हे आपल्या कार्याचा वारसा ठरेल. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच कायमस्वरूपी प्रभाव निर्माण होतो,” असे दा कोस्टा यांनी सांगितले.

रोटरॅक्ट आणि इंटरॅक्ट क्लबना आवश्यक सेवा, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊन ते पूर्णपणे कार्यरत करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“नवीन स्थापन होणाऱ्या सर्व रोटरॅक्ट क्लबच्या सदस्यांसाठी पुढील दोन महिन्यांत संपूर्ण रोटरॅक्ट अभिमुखता कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. रोटरीने आपल्याला अनेक वर्षे खूप काही दिले आहे आणि आपल्यात गुंतवणूक केली आहे. आमचे अध्यक्ष यिंका बाबालोला यांनी म्हटल्याप्रमाणे, आता परतफेड करण्याची वेळ आली आहे. ही उद्दिष्टे आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रम घेत आहे,” असे ते म्हणाले.

‘नेतृत्व करण्यासाठी परवानगीची वाट पाहू नका’

रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष यिंका बाबालोला यांनी रोटरॅक्टर्सना नेतृत्व करण्यासाठी कोणाच्या परवानगीची वाट न पाहता पुढे येण्याचे, आपले मत मांडण्याचे आणि स्वतःहून पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
“रोटरॅक्टर्सनी स्वतःच्या नेतृत्वाखाली समुदायाभिमुख काम उभे करण्याची गरज आहे. नवीन रोटरी क्लबची सर्वोत्तम ताकद ही पूर्वीच्या इंटरॅक्ट सदस्यांमध्ये आहे. पुढची पायरी सोपी आहे, ती म्हणजे सेवेचा प्रवास. रोटरॅक्टमधून रोटरीकडे जाणे म्हणजे रोटरॅक्टला मागे सोडणे नव्हे, तर स्वतःहून पुढाकार घेण्याची क्षमता अधिक विस्तारण्याची संधी आहे,” असे बाबालोला म्हणाले.
“रोटरी तुम्हाला धैर्य देते, कामाच्या ठिकाणी संघर्षांना सामोरे जाण्याची ताकद देते आणि विविध संधी उपलब्ध करून देते. रोटरी म्हणजे तुम्ही, तुमची ऊर्जा आणि तुमचे नेतृत्व. रोटरॅक्टची भावना सोबत घेऊन पुढे या आणि रोटरीच्या भविष्याला आकार द्या,” असे आवाहन त्यांनी केले.

भारतात १,००० रोटरॅक्ट क्लबचे लक्ष्य
आरआय संचालक फ्लाइट लेफ्टनंट के. पी. नागेश यांनी भारत हा तरुणांचा देश असल्याचे सांगत देशातील रोटरॅक्ट चळवळीचा आणखी विस्तार करण्याची गरज व्यक्त केली. देशाच्या सुमारे ६५ टक्के लोकसंख्येतील नागरिक ३५ वर्षांखालील असून हेच देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे तरुणांच्या माध्यमातून रोटरॅक्ट चळवळीचा विस्तार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
देशभरात सप्टेंबरपर्यंत १,००० रोटरॅक्ट क्लब स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती नागेश यांनी दिली.
“आम्ही १:२:३ हे सूत्र मांडले आहे. त्यानुसार भारतातील प्रत्येक रोटरी क्लबकडे दोन रोटरॅक्ट क्लब आणि तीन इंटरॅक्ट क्लब असावेत. या माध्यमातून तरुणांना संघटनेशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी आम्ही रोटरॅक्टर्सची संख्या दुप्पट केली असून ती जवळपास ५० हजारांवर पोहोचली आहे,” असे नागेश यांनी सांगितले.
“भारत हा तरुणांचा देश असून जगात सर्वाधिक रोटरॅक्टर्स असलेल्या देशांपैकी एक म्हणून आपली ओळख निर्माण करण्याची आमची इच्छा आहे. ही चळवळ आणखी वाढवून २०२६-२७ पर्यंत देशात एक लाख रोटरॅक्टर्स करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें