नागपंचमी
‘सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वर आहे’, हे शिकवणारा सण ! नागपंचमी हा सणांचा राजा असलेल्या श्रावण मासातील पहिला सण ! हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो. या वर्षी नागपंचमी १७ ऑगस्ट २०२६ या दिवशी आहे. या दिवशी स्त्रिया उपवास करतात, नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नाग देवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. नाग देवतेचे पूजन केल्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होण्याचे संकट टळते. नागपंचमी कशी साजरी करावी याविषयी माहिती जाणून घेऊया.
नागपंचमी अशी साजरी करा !
उपवास करा.
उपवास केल्याने शक्ती वाढते आणि उपवासाचे फळ मिळते.
नाग देवतेची पूजा करा.
‘नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे, म्हणजे नाग देवतेला प्रसन्न करून घेणे. या दिवशी नागाची पूजा करणे, म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे. त्यामुळे त्या दिवशी वातावरणात आलेल्या शिव-लहरी आकृष्ट होऊन त्या जिवाला ३६४ दिवस उपयुक्त ठरतात. स्त्रियांनी नागाच्या आकृत्यांचे भावपूर्ण पूजन केल्याने तिला शक्ती-तत्त्व प्राप्त होते.
नागाच्या आकृतीची भाऊ म्हणून पूजा करा.
या विधीमध्ये स्त्रियांनी नागांचे ‘भाऊ’ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते.
नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करा.
असे केल्याने आनंद आणि चैतन्य यांच्या लहरी आकर्षित होतात.
स्त्रियांनी झोका खेळावा.
यामुळे क्षात्रभाव आणि भक्तीभाव वाढून त्यातून सात्त्विकतेच्या लहरी मिळतात.
प्रार्थना करावी.
या दिवशी पुढील प्रार्थना करावी – ‘आपल्या कृपेने या दिवशी शिवलोकातून प्रक्षेपित होणारी तरंगे माझ्याकडून अधिकाधिक ग्रहण होऊ दे. माझ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये येणार्या सर्व अडचणी नष्ट होऊ दे. माझ्या पंचप्राणामध्ये देवतांची शक्ती सामावली जाऊन ईश्वरप्राप्ती आणि राष्ट्ररक्षण यांसाठी तिचा उपयोग होऊ दे. माझ्या पंचप्राणाची शुद्धी होऊ दे.’ नागपंचमीच्या दिवशी बहिणीची हाक ईश्वराच्या चरणी पोहोचते. त्यामुळे बहीणीने भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करावी ‘त्याला सद्बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य दे.’
संदर्भ ग्रंथ : सनातनचा ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’ ग्रंथ
संकलक : श्री. तुळशीदास गांजेकर, सनातन संस्था
(संपर्क क्रमांक : ९३७०९ ५८१३२)






