व्हेवज् ३.०साठी जगभरातून ६३२ प्रवेशिका; गोव्याच्या वाढत्या चित्रपट संस्कृतीला बळ
पणजी, १२ एप्रिल : व्हेवज् इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल (गोवा-इंडिया ३.०) च्या तिसऱ्या आवृत्तीस जगभरातून तब्बल ६३२ प्रवेशिका प्राप्त झाल्या असून या महोत्सवाची वाढती आंतरराष्ट्रीय ओळख आणि स्वतंत्र चित्रपट निर्मितीबाबत वाढता उत्साह अधोरेखित झाला आहे.
रविवारी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. आयोजक आणि परीक्षकांनी वाढत्या सहभागाबद्दल आणि लघुपट निर्मितीच्या बदलत्या प्रवाहाबद्दल आशावाद व्यक्त केला.
महोत्सव संचालक अमोल आजगांवकर यांनी सांगितले की, यंदाच्या नोंदींचा व्यापक आणि विविध स्वरूपाचा प्रतिसाद हा या व्यासपीठासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. “यंदाचा प्रतिसाद दर्शवितो की व्हेवज् सातत्याने आपली व्याप्ती वाढवत असून जगभरातील चित्रपट निर्मात्यांसाठी एक मान्यताप्राप्त व्यासपीठ बनत आहे,” असे ते म्हणाले.
महोत्सवातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे ‘६० अवर्स चॅलेंज’, जे व्हेवज् इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल ३.० चा अविभाज्य भाग असून यंदा त्याची पाचवी आवृत्ती आहे. या स्पर्धेत सहभागी संघांना केवळ ६० तासांत संकल्पना मांडण्यापासून पटकथा, कलाकार निवड, चित्रीकरण, संपादन आणि अंतिम सादरीकरणपर्यंत संपूर्ण लघुपट तयार करावा लागतो. यंदा ५० संघांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ४२ संघांनी यशस्वीरित्या आपले चित्रपट पूर्ण करून सादर केले. या स्पर्धेत देशभरातील प्रतिभावान संघांनी कमी वेळेत सर्जनशीलता साकारली.
देहरादून येथे झालेल्या मागील आवृत्तीच्या यशानंतर गोव्यात होणारी व्हेवज् ३.० ही सातत्य आणि विस्ताराचे प्रतीक ठरत असून राज्याच्या सर्जनशील केंद्र म्हणून असलेल्या स्थानाला अधिक बळ मिळत आहे.
पत्रकार परिषदेत गुरपाल सिंग, अशोक राणे आणि शर्मद रायतुरकर यांसारख्या मान्यवर परीक्षकांसह गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते ग्रँट डेव्हिस उपस्थित होते. सहआयोजक राजाराम गोपाळ तुरी देखील उपस्थित होते.
परीक्षकांनी अशा महोत्सवांमुळे नवोदितांना संधी मिळते आणि नव्या कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध होते, असे मत व्यक्त केले.
चित्रपट समीक्षक आणि इंडियन फिल्म अकॅडमीचे संस्थापक-संचालक अशोक राणे यांनी गेल्या दशकात देशभरात वाढलेल्या चित्रपट महोत्सवांचा उल्लेख करत व्हेवज् हा संवाद, सहकार्य आणि कल्पनांची देवाणघेवाण यासाठी महत्त्वाचा मंच असल्याचे सांगितले. त्यांनी चित्रपट निर्मात्यांना कथनशैलीत प्रयोग करण्याचे आवाहन केले.
शर्मद रायतुरकर यांनी चित्रपट निर्मितीतील बदलत्या प्रवाहावर प्रकाश टाकत लघुपटांची वाढती गुणवत्ता आणि एआय-आधारित साधनांसह डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याचे नमूद केले. त्यांनी इच्छुक निर्मात्यांना पुढाकार घेऊन निर्मिती सुरू करण्याचे आवाहन केले.
गुरपाल सिंग यांनी लघुपट हे मोठ्या चित्रपटसृष्टीकडे जाण्याचे प्रवेशद्वार असल्याचे सांगत प्रभावी कथन अनेकांना गंभीरपणे चित्रपट निर्मितीकडे वळवते, असे मत व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते ग्रँट डेव्हिस यांनी सादर झालेल्या चित्रपटांतील विविधता आणि मौलिकतेचे कौतुक करत मर्यादित साधनांमध्येही प्रभावी कथा सांगता येते, असे सांगितले. “सर्जनशीलता बजेटवर नव्हे तर दृष्टिकोनावर अवलंबून असते,” असे ते म्हणाले.
७ ते १० मे दरम्यान गोव्यात होणाऱ्या व्हेवज् ३.० मध्ये जगभरातील चित्रपट निर्माते, कलाकार आणि प्रेक्षक एकत्र येणार असून नाविन्य, कथाकथन आणि सिनेमॅटिक उत्कृष्टतेचा उत्सव साजरा केला जाणार आहे.






