दिनांक : ११.३.२०२६
_*गोवा सरकारचे अभिनंदन; ‘गड-दुर्ग संवर्धन प्राधिकरण’ स्थापन करण्याची मागणी*_
*गोमंतकीय हिंदूंची अनेक वर्षांची मागणी पूर्ण; ‘मर्दनगड’ व ‘हातकातरो खांब’ संरक्षित स्मारके घोषित केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन ! – हिंदु जनजागृती समिती*
पणजी, ११ मार्च – गोवा सरकारने ‘गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा, १९७८’ अंतर्गत फोंडा येथील ‘मर्दनगड’ आणि जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ या ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. हिंदु जनजागृती समिती गोवा सरकारचे मनापासून अभिनंदन करते. गोमंतकातील हिंदूंची अनेक वर्षांपासूनची मागणी सरकारने पूर्ण केली आहे, अशी प्रतिक्रिया हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी दिली आहे.
श्री. नाईक पुढे म्हणाले की, फोंडा येथील मर्दनगड किल्ला हा छत्रपति संभाजी महाराज यांनी बांधलेला गोव्यातील एकमेव किल्ला आहे. हा किल्ला महाराजांचे शौर्य आणि धैर्य यांचे प्रतिक आहे. गोव्यातील सर्व गड किल्ले, तसेच गड किल्ल्यांचा इतिहास आणि संस्कृती यांचे संवर्धन करून हा ऐतिहासिक ठेवा, भावी पिढीपर्यंत पोहोचवणे यासाठी ‘मर्दनगड संवर्धन समिती’ने पुढाकार घेतला आहे. हिंदु जनजागृती समिती ‘मर्दनगड संवर्धन समिती’मध्ये सक्रिय सहभागी आहे. ‘मर्दनगड संवर्धन समिती’च्या मोहिमेला लाभलेले हे यशच आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानदिनाच्या आधी सरकारने केलेली ही घोषणा, छत्रपती संभाजी महाराजांना खर्या अर्थाने श्रद्धांजली आहे.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी देखील गोवा सरकारचे अभिनंदन करत म्हणाले की, जुलमी पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी गोमंतकातील हिंदूंवर केलेल्या अनन्वित अत्याचाराची ‘हातकातरो खांब’ ही गोव्यातील एकमेव साक्ष आहे. या ‘हातकातरो खांबा’चे ऐतिहासिक वारसा म्हणून जतन आणि संरक्षण व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समिती गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नरत आहे. ‘हातकातरो खांब’ संरक्षित स्मारक व्हावे, यासाठी समितीने आतापर्यंत शेकडो निवेदने दिली, अनेक आंदोलने केली, पत्रकार परिषदा घेतल्या; गेल्या ‘गोवा क्रांतीदिनी’ हातकातरो खांब या ठिकाणी गोवा क्रांती लढ्यात हुतात्मा झालेल्या क्रांतीकारकांना श्रद्धांजली वहात या विषयाकडे गोवा सरकार, पुरातत्व खाते, इतिहासप्रेमी आदींचे लक्ष वेधून घेतले होते. ‘मर्दनगड किल्ला’ आणि ‘हातकातरो खांब’ संरक्षित स्मारके घोषित करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय हा हिंदु जनजागृती समितीसह गोमंतकातील हिंदु संघटनांनी उभारलेल्या लढ्याचे यशच आहे, असेही श्री. शिंदे म्हणाले.
सरकारने मर्दनगडाचा इतिहास लवकरात लवकर अधिसूचित करावा. ‘हातकातरो खांब’ आणि ‘मर्दनगड किल्ला’ यांचा इतिहास दर्शवणारे फलक त्या परिसरात लावावेत, या दोन्ही स्मारकांच्या इतिहासचा समावेश पाठ्यपुस्तकात करावा आणि गोव्यात स्वतंत्र ‘गड-दुर्ग संवर्धन प्राधिकरण’ स्थापन करावे, अशी मागणीही हिंदु जनजागृती समितीने केली आहे, असे श्री. नाईक म्हणाले.
आपला नम्र,
*डॉ. मनोज सोलंकी,*
हिंदु जनजागृती समिती, गोवा.
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)






