*गोव्यात भव्य आणि रंगतदार कार्निव्हल २०२६ साजरा करण्याची जय्यत तयारी*
*पणजी, १२ जानेवारी २०२६* – गोवा सरकारचा पर्यटन विभाग गोव्यातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रतीकात्मक अशा गोवा कार्निव्हल २०२६ साठी सज्ज झाला आहे. आनंद, रंग, संगीत आणि एकतेचा उत्सव असलेला कार्निव्हल स्थानिक नागरिकांबरोबरच पर्यटकांमध्येही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा उत्सव गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि उत्सवी परंपरेचे प्रतीक आहे.
कार्निव्हल उत्सवाची सुरुवात १३ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्वरी येथे पारंपरिक कर्टन रेजर कार्यक्रमाने होणार आहे. मिरवणुकीचा मार्ग आयएचएम ते एसीडीआयएल शाळा असा असेल. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी पणजी येथे नव्यो पाटो ब्रिजपासून काम्पाल मैदानापर्यंत भव्य कार्निव्हल मिरवणूक काढण्यात येईल.
१५ फेब्रुवारी २०२६ (रविवार) रोजी मडगाव येथे उत्सव साजरा होईल. येथे मिरवणूक होली स्पिरिट चर्चपासून मडगाव नगरपालिका चौकापर्यंत निघेल.
१६ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) रोजी वास्को द गामा येथे कार्निव्हल साजरा होणार असून, मिरवणूक सेंट अँड्र्यूज जंक्शन (स्वातंत्र पथ) ते जोशी चौक / रेल्वे स्टेशनपर्यंत जाईल.
कार्निव्हलचा समारोप १७ फेब्रुवारी २०२६ (मंगळवार) रोजी म्हापसा आणि मोरजी येथे होईल. म्हापसा येथे मिलाग्रिस चर्चमागील कोमुनिदाद इमारतीपासून देव बोडगेश्वर मंदिराजवळील कोमुनिदाद मैदानापर्यंत मिरवणूक निघेल. मोरजी येथे मोरजी खिंड ते राज सुपर मार्केटजवळील मोरजी जंक्शनपर्यंत मिरवणूक होईल.
यावेळी पर्यटन मंत्री माननीय श्री. रोहन ए. खंवटे म्हणाले,“गोवा कार्निव्हल हा आनंद, समावेशकता आणि सांस्कृतिक अभिमानाचा उत्सव आहे. राज्यभर विविध ठिकाणी हा उत्सव साजरा करून अधिकाधिक लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कार्निव्हल २०२६ आमच्या जबाबदार आणि रिजनरेटिव्ह पर्यटनाच्या दृष्टीकोनाचे प्रतिबिंब असेल, ज्यात परंपरा जपताना लोक आणि पर्यावरणाचीही काळजी घेतली जाईल.”
पर्यटन संचालक श्री. केदार नाईक यांनी सांगितले, “कार्निव्हल हा गोव्याच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीचा अत्यंत रंगतदार उत्सव आहे. गोवा कार्निव्हल २०२६ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल, सुरक्षितता, स्वच्छता आणि दर्जेदार आयोजन यावर भर देण्यात आली आहे. राज्यभर समन्वयाने होणाऱ्या उत्सवांमुळे नागरिक आणि पर्यटकांना आनंददायी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अनुभव मिळेल.”
प्रत्येक ठिकाणी रंगीबेरंगी चित्ररथ, आकर्षक नृत्य, संगीत आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळेल. कार्निव्हल हा समुदाय, कलाकार, कलाकार मंडळी आणि पर्यटकांना एकत्र आणणारा अनोखा सांस्कृतिक अनुभव आहे, जो गोव्याला समुद्रकिनाऱ्यांपलीकडील ओळख देतो.
पर्यटन विभागाच्या धोरणानुसार, गोवा कार्निव्हल २०२६ मध्ये जबाबदार उत्सव, स्वच्छता, सुरक्षितता आणि समुदाय सहभाग यावर विशेष भर देण्यात येईल. गोव्याची सांस्कृतिक ओळख आणि पर्यावरणीय समतोल जपत आनंददायी अनुभव निर्माण करणे हे या उत्सवाचे उध्दिष्ट आहे.
गोवा पर्यटन विभाग राज्यातील नागरिक, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना या भव्य उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करतो. कार्निव्हलशी संबंधित मिरवणुकीच्या वेळा आणि इतर कार्यक्रमांची माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.






