——————————
बांगलादेशातील प्रमुख युवा नेता शरीफ उस्मान हादी याच्यावर ढाका येथे गोळीबार झाल्यानंतर त्याचा उपचाराच्या आधीच मृत्यू झाला. यानंतर बांगलादेशामध्ये हिंदूंच्या विरुद्ध जाणीवपूर्वक हिंसाचार घडवून आणला जात आहे. यात बांगलादेशातील मयमनसिंह भागात सनातन धर्म मानणार्या तरुण हिंदू दीपू चंद्र दास या निरपराध हिंदू युवकाची जमावाकडून अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. वृत्तानुसार त्याला झाडाला बांधून जिवंत जाळण्यात आले, अशा घटना तेथील हिंदू समाजात तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण करणार्या आहेत. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समाजावर सुनियोजित, संघटित व क्रूर स्वरूपाचे अत्याचार सुरू आहेत. केवळ हिंदूंच्या हत्या नव्हे, तर हिंदूंची घरे, मंदिरे जाळण्यात येत आहेत, महिलांवर बलात्कार होत आहेत, अनेक ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे. याचे प्रत्यक्ष व्हिडिओ, साक्षी व आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीमाध्यमांतून उघड झालेले सत्य आहे.
भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूविरोधी घटनांचा तीव्र निषेध नोंदवून, दीपू चंद्र दास यांच्या हत्येसह अशा सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी, गुन्हेगारांना कठोर शिक्षा आणि पीडित कुटुंबांना भरपाई याची तातडीची लेखी हमी बांगलादेशकडून घ्यावी. भारत–बांगलादेश दरम्यान हिंदू, बौद्ध, ख्रिस्ती आदी अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्य व मंदिरांच्या सुरक्षेबाबत स्वतंत्र करार करावा आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी संयुक्त समिती स्थापन करावी. संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग, SAARC यांसारख्या मंचांवर बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराचा मुद्दा अधिकृत आकडेवारीसह मांडून ‘फॅक्ट-फाइंडिंग मिशन’ची मागणी करावी. धार्मिक छळामुळे भारतात येणार्या हिंदूंना तात्पुरते संरक्षण, नागरिकत्व किंवा दीर्घकालीन व्हिसा देण्यासाठी मानवतावादी आणि पारदर्शक धोरण तयार करावे. बांगलादेशातील मंदिरे, स्मशानभूमी व धार्मिक संपत्तीचे संयुक्त सर्वेक्षण व डिजिटल नोंदणी करण्यात यावी. बळकावलेली मंदिरे व जमीन मूळ मालकांना परत मिळावी, यासाठी भारत सरकारने ठोस भूमिका घ्यावी. बांगलादेशातील हिंदू समाजाशी भारत सरकारने थेट संवाद राखून त्यांच्या स्थिती, गरजा आणि मागण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कायमस्वरूपी संवाद–यंत्रणा तयार करावी. अत्याचार थांबत नसतील तर बांगलादेशासोबतचे आर्थिक, व्यापारिक व राजनैतिक निर्बंध घालण्याचा निर्णय घ्यावा, तसेच बांगलादेशातील दहशतवादी व कट्टरतावादी घटकांविरोधात कठोर पावले उचलली जावीत. भारत हा जगातील सर्वात मोठा हिंदूबहुल देश आणि बांगलादेशचा सर्वांत निकटचा शेजारी असल्याने तेथील हिंदूंच्या जिवित, संपत्ती व धर्मस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी भारताची भूमिका घ्यावी.
श्री. सत्यविजय नाईक, हिंदु जनजागृती समिती, राज्य संघटक. (संपर्क क्रमांक – ९१५८९ ५४४५५)






