मांद्रे बीचवर अनधिकृत बीच वेडिंग केल्याबद्दल पर्यटन खात्याकडून रिवा बीच रिसॉर्टला ‘शो कॉज नोटीस’
मांद्रे, १९ नोव्हेंबर २०२५ – पर्यटन विभागाने रिवा बीच रिसॉर्ट, मांद्रे यांना १७ नोव्हेंबर २०२५ रोजी मांद्रे बीचवर आवश्यक परवानगी न घेता बीच वेडिंग केल्याबद्दल अधिकृत शो कॉज नोटीस जाहीर केली आहे. ही परवानगी गोवा टुरिस्ट प्लेसेस प्रोटेक्शन अँड मेंटेनन्स अॅक्ट, २००१ अंतर्गत अनिवार्य आहे.
१७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता (१८:०० तास), मांद्रेबी चवर तैनात असलेल्या टुरिस्ट वॉर्डनने बीच वेडिंगसाठी अनधिकृत सेटअप उभारला जात असल्याची माहिती दिली. तक्रार मिळताच, टुरिस्ट वॉर्डनने पर्यटन पोलिसांच्या मदतीने तयारी थांबवली आणि रिसॉर्टच्या प्रतिनिधींना सेटअप हटवण्यास सांगितले. स्पष्ट निर्देश मिळूनही, रिसॉर्टने सरकारी नोटिफाइड बीच क्षेत्रात नियमांचे उल्लंघन करत कार्यक्रम सुरू ठेवला आणि आवश्यक शुल्कही भरले नाही.
विभागाने नमूद केले की अशा प्रकारचे वर्तन गोवा टुरिस्ट प्लेसेस प्रोटेक्शन अँड मेंटेनन्स अॅक्ट, २००१ मधील अनेक तरतुदींचे उल्लंघन करते. या कायद्यानुसार जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतली नसता कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा कंपनी पर्यटन स्थळावर कोणतीही अशी कृती करू शकत नाही जी त्रास, धोका, अस्वस्थता किंवा परिसराचे नुकसान करते,.

उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर, विभागाने रिवा बीच रिसॉर्ट प्रा. लि. यांना १,००,००० रुपये (एक लाख रुपये) दंड ७ दिवसांच्या आत जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच, रिसॉर्टला, गोवा रजिस्ट्रेशन ऑफ टुरिस्ट ट्रेड अॅक्ट, १९८२ आणि नियम १९८५ अंतर्गत कारवाई, ज्यात त्यांच्या नोंदणीचे रद्दीकरण शक्य आहे, कारवाई का करू नये? हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे. तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कारवाई का करू नये याबद्दलही स्पष्टीकरण मागितले आहे.
पर्यटन विभागाने सर्व पर्यटन व्यवसायिकांना पुन्हा एकदा कळवले आहे की गोव्याच्या बीच आणि पर्यटन क्षेत्रांवर लागू असलेल्या कायदे आणि नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. सार्वजनिक सुरक्षेचे रक्षण, पर्यावरणाचे संवर्धन आणि राज्याच्या पर्यटन संपत्तीचे संरक्षण यासाठी अनधिकृत कार्यक्रमांना अजिबात परवानगी दिली जाणार नाही आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.






