उझबेकिस्तानच्या कॉन्स्टँटिन बेलूसोव्ह आणि यूकेच्या एली गॅरेट यांचा आयर्नमॅन 70.3 गोवा, इंडीया २०२५ मध्ये विजेतेपदावर ठसा
~ नेते तेजस्वी सूर्या आणि के. अन्नामलाई यांनीही फिनिश लाईन पार केली, जगभरातील खेळाडूंसोबत गोव्यातील या मोठ्या स्पर्धेत सहभाग ~
गोवा, ९ नोव्हेंबर २०२५: आयर्नमॅन 70.3 गोवा, इंडीया च्या पाचव्या आवृत्तीची सुरुवात रविवारी सकाळी सूर्योदयासोबत मिरामार बीचवर अतिशय भव्यपणे झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन संचालक श्री. केदार नाईक, रेस डायरेक्टर दीपक राज, अभिनेत्री आणि रेस वीकेंड अॅम्बेसेडर सयामी खेर, इव्हेंट डायरेक्टर नील डिसिल्वा आणि सुनील मोरजकर यांनी स्पर्धेचा शुभारंभ केला. ३१ देशांमधील १३०० पेक्षा अधिक ट्रायअॅथलिट्सनी अरबी समुद्रात उडी मारत स्पर्धेला शानदार सुरुवात केली. या पाच आवृत्त्यांमध्ये स्पर्धेत सहभागी झालेल्या देशांची संख्या आता ६२ वर पोहोचली आहे.
उझबेकिस्तानच्या कॉन्स्टँटिन बेलूसोव्ह यांनी पुरुष गटात ४:२५:४७ वेळेत स्पर्धा पूर्ण करून विजेतेपद पटकावले. तर यूकेच्या एली गॅरेट यांनी महिलांच्या गटात ५:१८:४३ वेळेत उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद मिळवले. भारतीय वायुदलाच्या टीमने रिले स्पर्धेत तिन्ही स्थानांवर सहज विजय मिळवला.
स्पर्धेत १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी धावणे अशा कठीण तीन टप्प्यांचा समावेश होता. हा प्रवास गोव्याच्या सुंदर किनाऱ्यांमधून आणि वारसास्थळांच्या गल्लीवजा रस्त्यांतून जात होता. मार्गभर जमलेल्या शेकडो समर्थकांनी उत्साहाचे वातावरण निर्माण केले. यातून गोवा आशियातील सर्वात सुंदर आणि खेळाडू-मैत्रीपूर्ण आयर्नमॅन ठिकाण म्हणून मजबूत होत असल्याचे दिसून आले.
एक भावनिक क्षण म्हणजे महिलांच्या विजेत्या एली गॅरेट यांनी आपल्या पती टॉम गॅरेटसोबत शर्यत पूर्ण केली. टॉमने ४:५१:३७ वेळेसह आठवा क्रमांक मिळवला. दोघांनी मिळून जगभरात ३० पेक्षा जास्त हाफ-डिस्टन्स आणि १० फुल-डिस्टन्स आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केल्या आहेत. यंदा त्यांनी जागतिक स्पर्धेचे पात्रता स्लॉटचा त्याग करून गोव्याच्या अनोख्या वातावरणाचा आनंद घेतला.
एली म्हणाली, “ही स्पर्धा अप्रतिम होती. मी केलेल्या ७०.३ पैकी ही सर्वाधिक कठीण होती, पण समुद्राकडे पाहत धावताना वेदनाही कमी वाटली. ही स्पर्धा पुन्हा घरगुती वाटणाऱ्या वातावरणाची आठवण करून देणारी होती. फिनिश लाइन पार करताच सर्व वेदना दूर होतात, ते काही सेकंद खूप खास असतात.”
टॉम म्हणाला, “आज माझ्याकडे माझी बाईक नव्हती तरी मी माझ्या वयोगटात पहिले स्थान मिळवले आणि टॉप १० मध्ये आलो याचा मला आनंद आहे. एलीने विजय मिळवल्याने तर मी खुपच खूश आहे. . आम्हाला गोवा खूप आवडला, येथील लोक, जागा, अन्न, हवामान, सर्व अपेक्षेपेक्षा जास्त उत्तम. आम्ही इथे अनेक वर्षे स्पर्धा करायची इच्छा बाळगली होती आणि आता आलो आहोत तर पुन्हा नक्की येऊ. स्थानिक लोकांचा पाठिंबा अप्रतिम होता; लहान मुले हाय-फाईव्ह देत होती, लोक सतत प्रोत्साहन देत होते, तुम्ही स्वतःला मर्यादेपर्यंत ढकलत असताना हे सगळं खूप महत्त्वाचं असतं.”
वीकेंडच्या आनंदात भर घालत, ऑलिम्पिक जलतरणपटू आणि प्रशिक्षक संदीप सेजवाल यांनी इन्स्पायर इंस्टूट्यूट ऑफ स्पोर्ट मधील सहकाऱ्यांसह, ऋषभ चौहान आणि मकरंद माने, रिले कॅटेगरीत सहभाग घेतला आणि ६:०७:०६ वेळेसह १४०वे स्थान मिळवले.
लोकसभा सदस्य तेजस्वी सूर्या यांनी सलग दुसऱ्या वर्षी आयर्नमॅन 70.3 गोवा, इंडीया पूर्ण केली. त्यांच्यासोबत के. अन्नामलाई यांनीही स्पर्धा पूर्ण करत, आयर्नमॅन पदवी मिळवणारे देशातील केवळ दुसरे राजकीय नेते बनले.
मुख्य स्पर्धेबरोबरच शनिवारी पॉलिसीबजार आयर्नकिड्स स्पर्धेत ९०० हून अधिक मुलांच्या सहभागामुळे वातावरण आणखी रंगतदार झाले. यामुळे गोव्यातील पुढील पिढीच्या ट्रायअॅथलिट्सचा उत्साह आणि क्षमताही दिसून आली.
स्पर्धेचे निकाल:
पुरुष गट (एकूण):
1. कॉन्स्टँटिन बेलूसोव्ह (उझबेकिस्तान) – ४:२५.४७
2. मायकेल लेहनिग (जर्मनी) – ४:३६.४२
3. मायकेल झोल्सर (झेक रिपब्लिक) – ४:४२.१९
महिला गट (एकूण):
1. एली गॅरेट (युनायटेड किंगडम) – ५:१८.४३
2. टिमटिम शर्मा (भारत) – ५:२३.२७
3. लुसी ब्लॅंचर्ड (युनायटेड किंगडम) – ५:३२.०४
रिले गट (एकूण):
1. एअर फोर्स टीम 3 – ४:१७.२०
2. एअर फोर्स टीम 01 – ४:१७.२६
3. एअर फोर्स टीम 3 – ४:१८.१२






