‘गोवा दीपोत्सव 2025’ ने पर्वरी, सालीगांव आणि म्हापसा उजळले; संस्कृती, परंपरा आणि आनंदाचा संगम

‘गोवा दीपोत्सव 2025’ ने पर्वरी, सालीगांव आणि म्हापसा उजळले; संस्कृती, परंपरा आणि आनंदाचा संगम

म्हापसा, २७ ऑक्टोबर २०२५: गोवा पर्यटन विभागाने गोवा दीपोत्सव २०२५ या दोन दिवसांच्या उत्सवाचे यशस्वी आयोजन केले. पर्वरी, सालीगांव आणि म्हापसा येथे दिवाळीचा उत्साह, संगीत आणि सामाजिक एकतेने उजळलेला हा सोहळा गोव्याच्या लोकांनी एकत्र येऊन साजरा केला.

म्हापसा येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. म्हापसा टॅक्सी स्टँड ग्राउंड येथे झालेल्या कार्यक्रमात अखिल गोवा आकाश कंदील स्पर्धा, पाककला आणि फुगडी स्पर्धा तसेच आकर्षक सांस्कृतिक सादरीकरणे झाली. रिदम ऑफ लाईट्स या संगीत कार्यक्रमाने संध्याकाळ रंगवली, ज्यात गोव्याची विविध संस्कृती आणि कलात्मकता सुंदररीत्या प्रतिबिंबित झाली.

माननीय पर्यटन मंत्री श्री रोहन खंवटे, माननीय उपसभापती व म्हापश्याचे आमदार श्री जोशुआ डीसुझा, म्हापसा नगरपालिकेच्या अध्यक्षा श्रीमती प्रिया मिशाळ, पर्यटन उपसंचालक श्री धीरज वागळे, जीटीडीसी चे उपमहाव्यवस्थापक (मार्केटिंग/हॉटेल्स) श्री दीपक नार्वेकर, पर्यटन सहाय्यक संचालक श्री जयेश काणकोणकर, तसेच नगरसेवक आणि माजी नगरसेवक या समारंभाला उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीने समारोप समारंभ अधिक खास झाला.

म्हापश्यातील उपस्थितांना संबोधित करताना पर्यटन मंत्री श्री रोहन खंवटे म्हणाले, “पर्यटन विभागाने २०२२ मध्ये गोवा बियॉंड बीचेस ही योजना सुरू केली, ज्याचा उद्देश राज्यातील पर्यटनाला किनाऱ्यांपुरते मर्यादित न ठेवता ग्रामीण आणि स्थानिक भागांपर्यंत पोहोचवणे आहे. शिगमो, कार्निव्हल, सां जांव, चिखल कालो आणि वीरभद्र उत्सव यांसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सांस्कृतिक पर्यटन वाढवण्यावर नेहमीच आमचे लक्ष राहिले आहे. ‘विकसित भारत २०४७’ च्या दृष्टीकोनातून महिलांना आणि तरुणांना सक्षम बनवण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत. महिलांसाठी फुगडी आणि पाककला स्पर्धा आणि युवकांसाठी आकाश कंदील स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आहेत. पुढील वर्षांपासून म्हापश्यामध्ये दीपोत्सव आणखी मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा आमचा मानस आहे.”

पर्यटन संचालक श्री केदार नाईक म्हणाले, “दीपोत्सवाला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद खूपच प्रेरणादायी आहे. लोकांनी दाखवलेली ऊर्जा, सहभाग आणि सृजनशीलता आमच्या ‘गोवा बियॉंड बीचेस’ या संकल्पनेला मूर्त रूप देतात. या कार्यक्रमाने प्रकाश, संस्कृती आणि आनंदाचा एक सुंदर संगम निर्माण केला.”

जीटीडीसीचे उपमहाव्यवस्थापक (मार्केटिंग/हॉटेल्स) श्री दीपक नार्वेकर यांनी आभार व्यक्त केले.
उत्सवाची सुरुवात २५ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हॉल, पर्वरी येथे झाली. येथे मातीच्या वस्तू बनवण्याच्या कार्यशाळा, चित्रकला, पाककला, फुगडी आणि वेषभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. संध्याकाळी सुर ताल या मनमोहक संगीत कार्यक्रमाने दिवसाची सांगता झाली. पुढील दिवशी, २६ ऑक्टोबर रोजी, उत्सव सालीगांव पंचायत क्षेत्रात रंगला, जिथे रांगोळी, पाककला आणि वेषभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. सुरों की दीपावली या संगीत कार्यक्रमाने दिवाळीच्या प्रकाशोत्सवाला साजेसा संगीतमेळा दिला.

गोवा दीपोत्सव २०२५ च्या माध्यमातून पर्यटन विभागाने सांस्कृतिक पर्यटन आणि समुदाय सहभाग वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुन्हा खात्री दिली. हा उत्सव गोव्याच्या समृद्ध परंपरेचे आणि एकतेचे प्रतीक ठरला, जिथे हजारो दिव्यांच्या प्रकाशात आनंद, अभिमान आणि संस्कृतीचे तेज झळकले.

Advertisement

 

Read More

Vote

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें