—————
विद्यार्थ्यांमध्ये अर्थसाक्षरता काळाची गरज
गुरुदास नाटेकर ः बालमतच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन
म्हापसा ः पुढारी वृत्तसेवा
विद्यार्थ्यांना लहानपणापासून अक्षर ओळख करून दिली जाते. त्याचप्रमाणे पॉकेटमनीच्या माध्यमातून अप्रत्यक्ष अर्थसाक्षरही करत असतात. सध्या विद्यार्थ्यांमध्ये अर्थसाक्षरता काळाची गरज आहे. त्यामुळे मुलांना भविष्यात त्यांचे स्वतःचे आर्थिक नियोजन करणे सोपे जाते, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक डॉ. गुरुदास नाटेकर यांनी सोमवारी म्हापसा येथे केले.
बालमत फाऊंडेशनच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ. गुरुदास नाटेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी फाऊंडेशनचे सदस्य भारत बेतकेकर, सचिव योगेश दिंडे, माजी मुख्याध्यापक महेश नागवेकर व मान्यवर उपस्थित होते.
डॉ. नाटेकर म्हणाले, अनेक मुलांना लहान वयातच अर्थसाक्षरतेचे ज्ञान अनुभवाने येते. पालक पॉकेटमनी म्हणून मुलांना किरकोळ पैसे खर्चासाठी देतात. त्या खर्चाचे नियोजन ही मुले करतात. जमा-खर्च, बेरीज-वजाबाकी यांचा ताळमेळ साधण्याची कला यामुळे मुलांना अवगत होते. आपला खर्च किती होतो, आपल्याला पॉकेटमनी किती मिळतो, त्या पैशांचे नियोजन कसे करायचे, अशी अनेक आर्थिक गणिते मुले जमा-खर्चाप्रमाणे करू लागतात. या माध्यमातून आपण मुलांना अर्थसाक्षर करत असतो. पूर्वीच्या काळी पॉकेटमनी देण्याची पद्धत रुढ नव्हती. मात्र आता ही बऱ्याच अंशी घराघरांत रुढ झाली आहे. मुलांच्या आनंदापोटी पालक त्यांना पॉकेटमनी देतात.
महेश नागवेकर म्हणाले, बालमत फाऊंडेशनने मुलांसाठी पॉकेटमनी, बचत विशेषांक प्रसिद्ध करून विद्यार्थी व पालकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. बचतीचे अर्थशास्त्र, बचतीचे महत्त्व या अंकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. पालकांनीही मुलांना पैशांच्या बचतीचे महत्त्व लक्षात आणून देणे गरजेचे आहे.
——–चौकट——-
बचतीचे महत्त्व वेळीच ओळखा
पालकांनी विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच बचतीचे महत्त्व पटवून द्यावे. यामुळे मुलांना त्यांचे भविष्य घडविणे सोपे जाईल. अर्थसाक्षरतेमुळे व्यावहारिक ज्ञानही त्यांना मिळेल. यासाठी पालकांनी सजग राहणे आवश्यक आहे. पालकांनी दैनंदिन बाजारहाट, दुकानांमधील खरेदी करतानाही मुलांना त्यासंबंधी मार्गदर्शन व माहिती देणे गरजेचे आहे, डॉ. गुरुदास नाटेकर म्हणाले.
बालमत फाऊंडेशनच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना डॉ. गुरुदास नाटेकर, योगेश दिंडे, महेश नागवेकर व भारत बेतकेकर.






