म्हापसा येथील एक अष्टपैलू साहित्यिक तथा इंडस्ट्रीयालिस्ट डॉ. गुरुदास भालचंद्र नाटेकर यांना पुणे येथील ‘विश्वशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे’तर्फे नुकताच राष्ट्रीय स्तरावरील ‘विश्वशांती साहित्य पुरस्कार

, २०२५’ प्रदान करून सन्मानित केले. हा पुरस्कार डॉ. नाटेकर यांना त्यांनी साहित्याच्या क्षेत्रातील विविधांगी वाङ्मयप्रकारांत आणि विविध भाषांत विपुल लेखनासाठी दिला गेला आहे. या पुरस्कार प्रदान सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, तर सम्माननीय अतिथी म्हणून गोवा राज्याचे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर विश्वशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजयभाऊ चौधरी, इन्स्टिटयूट मिनेझिस ब्रागांझाचे सदस्य सचिव अशोक परब, ॲड. एन. डी. पाटील, श्रीमती बिना नाईक, ॲड. एच. एल. नाईक, पर्यावरणवादी राजेंद्र केरकर, डॉ. दिगंबर नाईक, ॲड. महेश राणे, ॲड. अजितसिंग राणे, व इतर मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम ‘विश्वशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पुणे व इन्स्टिटयूट मिनेझिस ब्रागांझाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. हा सोहळा इन्स्टिटयूट मिनेझिस ब्रागांझाच्या सभागृहात पार पडला.
यावेळी बोलताना राजेंद्र केरकर यांनी डॉ. नाटेकर यांच्या विविध क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल गौरौउद्गार काढले. सत्काराला उत्तर देताना डॉ. नाटेकर यांनी विश्वशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे’तर्फे चालवलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
आतापर्यंत डॉ. नाटेकर यांची मराठी, कोकणी, हिंदी व इंग्रजी अशा चार भाषांतील ३१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ७ कादंबऱ्या, २ कवितासंग्रह, २ नाटक, १८ वैचारिक लेखसंग्रह तसेच २ संशोधनपर पुस्तकांचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे, ते फार्मसी क्षेत्रातील एम.फार्म.-टेक (मुंबई) व पी.एच.डी अशा माध्यमातून उच्चविद्याविभूषित आहेत व त्यांचे हे दोन्ही संशोधपपर प्रबंध सुधारित स्वरूपात अर्थांत परिष्करण करून पुस्तकरूपाने प्रकाशित झालेले आहेत.
त्यांचे पहिले पुस्तक म्हणजे, ‘एक वादळ घोंगावताना’ ही मराठी कादंबरी. ती मूळ मराठी कादंबरी नंतर कोकणी, हिदी व इंग्रजी भाषेत रूपांतरित/ भाषांतरित करून प्रकाशित झालेली आहे. तसेच त्या कादंबरीवर आधारित डॉ. गुरुदास नाटेकर यांच्या ‘भालचंद्र क्रिएशन’द्वारे निर्मित ‘रणसांवट’ चित्रपटाला अलीकडेच झालेल्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवातील ७ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात उत्कृष्ट चित्रपटनिर्माता – डॉ. गुरुदास नाटेकर , उत्कृष्ट कथा – डॉ. गुरुदास नाटेकर असे त्यांना दोन वैयक्तिक पुरस्कार प्राप्त झाले. सुमारे पाच वर्षांपूर्वी पणजी येथे झालेल्या ५०व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (‘इफ्फी’मध्ये) झाले होते. ते स्वत: त्या चित्रपटाचे निर्माता आहेत. त्याशिवाय, त्यांनी त्याच कादंबरीच्या कथानकाच्या आधारे लिहिलेल्या ‘रणसांवट’ या मराठीतील नाटकाला गोवा कला अकादमीच्या तसेच महाराष्ट्रातील नाट्यस्पर्धांत सादरीकरणासाठी सांघिक पारितोषिके मिळालेली आहेत.
डॉ. नाटेकर यांचे सामाजिक, साहित्य, उद्योग, शैक्षणिक, क्रीडा, नाट्य क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी २५० हून अधिक सत्कार झाले आहेत. राजकारणामध्येही ते सक्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत ५० पेक्षा जास्त संस्थांचे अध्यक्षपद भूषविले आहे/ भुषवत आहेत. प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर त्यांनी ज्ञानप्रसारक मंडळ, सहकार क्षेत्रातील म्हापसा अर्बन कॉ-ऑप बँक, महारुद्र संस्थान यांचे ते माजी अध्यक्ष होते. ते १७५ हून अधिक संस्थांशी संबंधित आहेत. म्हापशातील न्यू गोवा एज्युकेशनल ट्रस्ट संचालित जी. एस. आमोणकर विद्यामंदिरचे ते ट्रस्टी आहेत. डॉ. नाटेकर यांनी ६० पेक्षा अधिक नाटकांत भूमिका केल्या असून, त्यांनी निर्मित केलेल्या नाटकांना राष्ट्रीय व राज्य स्तरावर विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
फोटो कॅप्शन : म्हापसा येथील एक अष्टपैलू साहित्यिक तथा इंडस्ट्रीयालिस्ट डॉ. गुरुदास भालचंद्र नाटेकर यांना पुणे येथील ‘विश्वशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे’तर्फे नुकताच राष्ट्रीय स्तरावरील ‘विश्वशांती साहित्य पुरस्कार, २०२५’ प्रदान करताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, बाजूला सहकार मंत्री सुभाष शिरोडकर,विश्वशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजयभाऊ चौधरी, ॲड. एन. डी. पाटील, डॉ. दिगंबर नाईक, ॲड. महेश राणे, ॲड. अजितसिंग राणे, व इतर मान्यवर






